मुंबई प्रतिनिधी :
दि. 11 जुलै 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केले आणि आता शिंदे गटाकडून पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावरही दावा सांगितला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण त्याआधीच शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेत अर्ज दाखल केला आहे असे सूत्रांकडून समजते.
मागील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेना नेमकी कुणाची, यावर बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्याचे काही नगरसवेक, पदाधिकारी शिंदे गटाला समर्थन जाहीर करत आहेत तर ठाकरेंकडूनही शिवसैनिकांच्या समर्थनासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दोन्ही गटांकडून शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला जात असला तरी दोघांपैकी चिन्ह कुणाला मिळणार याबाबत साशंकता आहे. ठाकरे यांचे धनुष्यबाण आपल्याकडे राहणार असल्याचे ठाम मत आहे, तर शिंदे गटाकडूनही चिन्हावर दावा सांगितला जात आहे. त्यांच्याकडूनही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पण शिंदे गटाआधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आला आहे. आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ नये, अशी मागणी ठाकरे यांनी आयोगाकडे केली आहे असे सूत्रांकडून समजते. शिंदे गटाकडून चिन्हावर दावा सांगितल्यानंतर आयोगाकडून याबाबतची प्रक्रिया सुरू केली जाईल.
शिवसेनेचं चिन्ह जाणार नाही?
दोन तृतियांश आमदार फुटले तरी त्यांना गट बनवून एकाच नावाचा दुसरा पक्ष म्हणून राहाता येत नाही. त्यांना कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावे लागते. ते जे म्हणत आहेत की आम्ही शिवसेना आहोत, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे आणि ते एवढ्या लवकर ठरणार नाही. शिवसेनेचे चिन्ह कुठल्याही परिस्थितीत जाणार नाही. कारण शिवसेना हा 36 लाख सदस्यांचा पक्ष आहे. सदस्यसंख्येवर पक्ष बनला जातो. असं शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती आहे.