नागपूर प्रतिनिधी :
दि. 12 जुलै 2022
गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेचे १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार ही चर्चा रंगली आहे. यामुळे खासदारांकडे शंकेच्या नजरेने बघितले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात घेतलेल्या बैठकीला सेनेचे काही खासदार अनुपस्थित असल्याच्या बातम्या दिवसभर फिरत होत्या.
शिवसेनेचे काही खासदार उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मातोश्रीवर उपस्थित असूनही ज्यांची नावे दांडी मारलेल्या खासदारांच्या यादीत जोडली गेली अश्या खासदारांनी “आम्ही बैठकीला हजर होतो” हे सांगण्यासाठी एका वृत्तवाहिनीशी संपर्क साधला. याच यादीतील एक नागपूर जिल्ह्याच्या रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी बोर्डींग पासच या वृत्तवाहिनीला पाठवला. त्यानंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी बैठकीच्या हजेरीपत्रकाची प्रतही सादर केली.
शिवसेनेचे लोकसभेचे 19 आणि राज्यसभेचे 3 असे मिळून एकूण 22 खासदार आहेत. त्यातील संजय मंडलिक हे दिल्लीला असल्याने येऊ शकले नाहीत. बंडू जाधव यांनी आजारी असल्याचे आधीच कळवले होते. दमणच्या खासदार डेलकर यांनीही पक्षाला अनुपस्थितीबाबत कल्पना दिली होती आणि हिंगालीचे खासदार हेमंत पाटील हे उशिरा पोहोचले. त्यामुळे शिवसेनेच्या लेखी श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी हे दोनच खासदार अनुपस्थित असल्याची नोंद झाली आहे.
मात्र आज दिवसभर चर्चा होती ती मातोश्रीच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या खासदारांची. त्यामध्ये विदर्भातील तीन खासदारांचा समावेश असल्याचे सांगितले जात होते. विदर्भातील रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि वाशीम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांची नावे यात होती. तसे वृत्तही काही वाहिन्यांवरून प्रसारित झाले. यांपैकी भावना गवळी खरोखरच अनुपस्थित होत्या. पण प्रसारित झालेले ते वृत्त खोटे, खोडसाळपणाचे होते, असे खासदार तुमाने आणि खासदार पाटील यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत अनुपस्थित असल्याच्या अफवेने हेमंत पाटीलही चांगलेच चर्चेत होते. मात्र ते वृत्त खोडसाळपणाचे असून मुंबईच्या बैठकीला मी उपस्थित होतो, असे सांगत हजेरी पत्रकावर सही केलेल्या पानाची प्रतच त्यांनी सादर केली.
दोन दिवसांपूर्वी शिंदे समर्थक खासदारांची दिल्ली येथे कृपाल तुमाने यांच्या निवासस्थानी बैठक झाल्याची अफवा पसरली होती. प्रत्यक्षात तुमाने यावेळी नागपूरला होते. त्यामुळे एकनाथ शिंदेंबरोबरच्या बैठकीत उपस्थित असल्याचे वृत्त निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोणीतरी मुद्दाम खोडसाळपणा करीत आहेत. आपण शिंदे समर्थक असल्याचा अपप्रचार करीत आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.