मुंबई प्रतिनिधी :
दि. 15 जुलै 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. कोणत्याही राज्याला लाभणार नाहीत असे मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत. मात्र, आज मिडियासमोर ज्यांना अक्कल नाही तेही येऊन नक्कल करतात आहेत. शिंदे साहेबांनी त्यावेऴी एक इशारा केला असता तर हे लोक राज्यसभेतही पोहोचू शकले नसते, अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तारांनी शिवसेना खासदार संजय राऊतांना यांना टोला लगावल्याचे सूत्रांकडून समजते. मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात आज आयोजित करण्यात आलेल्या आमदारांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
शिंदे साहेबांचा आम्ही कुटुंब प्रमुख म्हणून आदेश पाळला. मात्र, आज ज्यांना अक्कल नाही तेही मिडियासमोर येऊन नक्कल करत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी आम्हाला एक इशारा जरी शिंदे यांनी केला असता तर हे लोक आज राज्यसभेत दिसणे शक्य नव्हते असा टोमणा सत्तारांनी राऊतांना मारला. ते पुढे म्हणाले की, आम्ही इमानदार राहिलो आणि शिवसेनेच्या राज्यसभेच्या आणि विधानपरिषद उमेदवारांना मतदान केले.आम्ही दगाफटका केला नाही. त्यावेळीही आम्ही शिंदेंच्या आदेशाचं पालन केलं. शिंदे साहेबांनी आत्ता जो निर्णय घेतला, तो बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा पुढे चालवण्यासाठी घेतला आहे. यामुळे आमचीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे, असे सत्तारांनी यावेळी सांगितले.
यावेळी सत्तारांनी आपल्या भाषणातून धुव्वाधार फलंदाजी केली. सत्तार पुढे म्हणाले, शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर आमच्या मतदारसंघासाठी दोन वर्षांत जी कामे झाली नाहीत ती काही तासांत मंजूर झाली. रात्री दोन वाजता त्यांनी माझ्या नगरपालिकेसाठी २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांना तर साधा पेन चालवण्यामध्ये अडचणी येत होत्या मात्र, शिंदे हे आपलेच मुख्यमंत्री असल्याने काही अडचण नाही. त्यांच्या उपकाराची परतफेड आम्ही करू शकणार नाही.
सत्तार म्हणाले, शिंदे हेच खरे शिवसेनेचे भविष्य असून त्यांच्याच खांद्यावर शिवसेनेची जबाबदारी असणे योग्य आहे. त्यांच्याच नेतृत्वाखालील शिवसेनेला शिवसेनेचे धनुष्यही मिळेल. शिंदेंच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचे विचार घेऊनच शिवसेना पुढे जात आहे. आत्तापर्यंतच्या बँका लेना बँका होत्या पण शिंदे हे देना बँक आहेत. दरम्यान राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार होते. मात्र, पवारांना कोल्हापुरचे धनंजय महाडिकांकडून पराभव पत्कारावा लागला होता. बहुधा सत्तारांना आजच्या भाषणातून हेच सांगायचे होते की मनात आणलं असतं तर संजय राऊतांचाही पराभव आम्ही करू शकलो असतो.