मुंबई प्रतिनिधी :
दि. 18 जुलै 2022
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानास सुरवात झाली आहे. १५ व्या राष्ट्रपतींसाठी एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू तर विरोधकांतर्फे यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. “महाविकास आघाडीतील अनेक आमदार पक्षमर्यादा झिडकारुन द्रौपदी मुर्मू यांच्या समर्थनात मतदान करतील,” असा विश्वास भाजप आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
“या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित आहे. आम्हाला रेकॉर्डब्रेक आमदारांचं समर्थन मिळेल,” असे शेलार म्हणाले. “आम्हाला जी अधिकची मतं मिळतील ती नक्कीच इतिहास घडवणारी असतील. महाविकास आघाडीचं अस्तित्वच राज्यात आता दिसत नाही, त्यामुळे त्यांच्या समन्वयाचा विषयच नाही,” असे शेलार म्हणाले.
“रोज तोंडावर आपटलेले आता पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करताहेत. राज्यसभा, विधानपरिषदेतही विरोधक असंच काहीसं बोलत होते. कायदा आणि संविधान स्पष्ट आहेत. ज्यांचा अभ्यास आहे त्यांना या गोष्टींची जाणीव आहे. हा निर्णय निःसंशयपणे शिंदे गटाच्या बाजूने लागेल,” असा विश्वास आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.