पंजाब प्रतिनिधी :
दि. 20 जुलै 2022
जवळ जवळ 5 तास चाललेल्या चकमकीत जगरूप उर्फ रूपा आणि मनप्रीत उर्फ मन्नू हे मूसेवालाचे दोन्ही मारेकरी पंजाब पोलिसांनी ठार केले आहेत. अटारी बॉर्डरजवळील एका जुनाट हवेलीत हे मारेकरी लपून बसल्याची टिप पोलिसांना मिळाली होती. त्यांच्याकडे एवढा दारूगोळा होता की ही चकमक पाच तासांहूनही जास्त काळ चालली होती. या मारेकर्यांकडे AK-47 रायफल सुद्धा सापडली आहे.
सिद्धू मूसेवालाच्या गाडीला अडवून या दोघांनीच तब्बल तीस गोळ्या त्याच्या शरीरात डागल्या होत्या. ‘पुरानी हवेली’, जिथे हे सहा ते सात मारेकरी लपले होते तिथे आता DGP, फॉरेन्सिक टीम पोहोचले आहेत. तिथले परीक्षण सुरू आहे. तसेच बॅलिस्टिक रिपोर्टवरून हेही शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे की आज सापडलेली हत्यारे आणि मूसेवालाच्या हत्येत वापरलेली गन यात काही कनेक्शन आहे का? ती गन सेमच होती का याचा तपास केला जाणार आहे.
आणखी एक महत्त्वाचा तपास पोलिस करत आहेत तो म्हणजे अंतर्गत शत्रू कोण आहे याचा. ही हवेली कोणाच्या मालकीची आहे? या मारेकर्यांना (की अतिरेक्यांना?) या हवेलीचा पत्ता कसा लागला? ते इतक्या बेमालूमपणे इथे कसे राहात होते? हे बरेच प्रश्न उभे राहिले आहेत. हे मारेकरी पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत होते असे समजते. हे ठिकाण पाकिस्तानपासून अवघ्या 9.35 किमीवर आहे.
या जगरूप आणि मनप्रीतला काही दिवसांपूर्वी अमृतसरजवळ तरणतारण इथे पाहाण्यात आलं होतं. तेव्हापासूनच पोलिस त्यांच्या मागावर होते. पण हे लोक अमृतसरहून तरणतारण आणि तिथून अटारी बॉर्डरपर्यंत कसे पोहोचले आणि या हवेलीत ते इतके दिवस सहजपणे कसे राहू शकले हा प्रश्न येत्या काही दिवसांत बर्याच जणांवर रोखला जाऊ शकतो.