दिल्ली प्रतिनिधी :
दि. 21 जुलै 2022
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या आज (गुरुवार, 21 जुलै) नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयासमोर चौकशीसाठी हजर होणार आहेत. यापूर्वी, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने राहुल गांधींची सलग काही दिवस, जवळ जवळ 51 तासांहून अधिक काळ चौकशी केली आहे.
सोनिया गांधी यांना ईडीने जूनमध्ये चौकशीसाठी नोटिस पाठवली होती. मात्र प्रकृती ठीक नसल्याने सांगून त्यांनी तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. त्यांची ही मागणी मान्य करत ईडीने चौकशीची तारीख वाढवून त्यांना 21 जुलैला हजर राहण्यास सांगितले होते. आज काँग्रेसने सर्व प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षांना दिल्लीत पाचारण केले आहे.
तपास यंत्रणांच्या गैरवापर होतो आहे असा ठपका ठेवत काँग्रेस संसदेसमोर रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे. कॉंग्रेसने इतर विरोधी पक्षांनाही एकता दाखवावी अशी विनंती केली आहे. दरम्यान वरिष्ठ नेत्यांनाही पक्षाच्या मुख्यालयात बोलावण्यात आले आहे.
ईडीच्या मुख्यालयात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वेळेवर पोहोचणार आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी तसेच पक्षाध्यक्ष त्यांच्यासोबत ईडी मुख्यालयापर्यंत असण्याची शक्यता आहे असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
सूत्रांकडून पुढे मिळालेल्या महितीनुसार दिल्ली पोलिसांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर पूर्णपणे नाकाबंदी केली आहे. कार्यालयाच्या दोन्ही गेट्सवर हेव्ही बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांसोबतच राखीव दलही सज्ज ठेवण्यात आले आहे.
ईडीने सोनिया गांधी यांच्या चौकशीसाठी दोन सहायक संचालक तसेच एका महिला सहायक संचालकांची नियुक्ती केली आहे. तब्बल 50 प्रश्नांच्या यादी ED कडून सोनियांसमोर ठेवली जाण्याची माहिती मिळते आहे.