मुंबई प्रतिनिधी :
दि. 21 जुलै 2022
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच मेट्रो 3 कारशेड आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत ‘आरे वाचवा’ या चळवळीतील सदस्यांनी तसेच पर्यावरणप्रेमी आणि आरेवासीयांनी शिंदे सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यावर आता आरे कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागे घेतली आहे असे विश्वासनीय सूत्रांकडून समजते.
आरे कारशेडच्या कामासाठी आता सरकारी हालचाली सुरू झाल्याचे दिसते आहे. आरेमध्ये कारशेड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात निर्णय झाला होता. मात्र, यावर महाविकास आघाडी सरकारने स्थगिती आणली होती. आता ही स्थगिती मुख्यमंत्र्यांनी हटवली आहे. “सरकारने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका आरेमधील नागरिकांनी घेतली होती.
गेल्या काही महिन्यांपासून आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यामुळे आता कारशेडचं काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसते आहे. सरकारने आरे मधील कारशेडवरील बंदी उठवल्याने मुंबईकर आणि पर्यावरणवाद्यांकडून अधिक आक्रमक आंदोलन केले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मेट्रो 3 कारशेड आरेमध्ये उभारण्यास शिवसेनेने सुरुवातीपासून विरोध दर्शवला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर आरेतील कारशेड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. कारशेड आरेतून कांजूरमार्गला हलवण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आरेमध्येच कारशेड उभारण्यात यावे, अशी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा या विषयाने जोर पकडला.