मुंबई प्रतिनिधी :
दि. 15 सप्टेंबर 2022
आमीर खानचा ‘लालसिंग चड्ढा’, अनुराग कश्यपचा, तापसी पन्नू अभिनीत ‘दो बारा’, ‘लायगर’ असे एकापाठोपाठ एक सिनेमे धारातीर्थी पडले. बॉक्स ऑफिसवर त्यांची पार धूळधाण झाली. याला कारण, सध्या जोर पकडलेली ‘बॉयकॉट बॉलीवूड’ ही मोहीम. असं म्हणतात की बॉलीवूडवाले मीडियाला मॅनेज करण्यात अमाप पैसा खर्च करतात. आपल्या आगामी सिनेमाच्या उत्तम रिव्हयूजपासून ते पेड प्रमोशनपर्यंत सारे काही डाव खेळून ते आपला सिनेमा सर्वोत्कृष्ट असल्याचा भ्रम जनतेसमोर निर्माण करतात. आजच्या मल्टिप्लेक्सच्या जमान्यात आणि भरमसाठ तिकीटदरांमुळे, तसेच एकाच वेळी हजारो स्क्रीन्सवर सिनेमा प्रदर्शित केल्यामुळे यांचे 100 करोड क्लब, 200 करोड क्लब सहजपणे पार होतात. मीडिया मॅनेज करणं बॉलीवुडच्या हातचा मळ आहे असं म्हटलं जात असलं तरी सोशल मीडियाने त्यांना भुईसपाट केले आहे अशी सर्वत्र चर्चा आहे. सोशल मीडियावर अर्थात फेसबुक, ट्विटरवर अक्षरशः लाखोंच्या संख्येने ‘बॉयकॉट बॉलीवूड’ ही मोहीम ट्रेंड करते आहे असे समजते.
या पार्श्वभूमीवर ‘ब्रह्मास्त्र’च्या रेकॉर्डब्रेक कमाईचे केले जाणारे दावे खोटे पाडणारे आकडेही सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत. मोकळ्या थिएटर्सने कमाईचा उच्चांक गाठलाच कसा असा प्रश्न लोक विचारत आहेत असे समजते. बर्याच ठिकाणी रिकाम्या थिएटर्सचे फोटोही शेअर झालेत.
ही सगळी परीस्थिती आणि एकूण मोहिमेची व्याप्ती पाहाता ‘ब्रह्मास्त्र’ सुपरफ्लॉप चित्रपटांच्या यादीत सामील झालाय का? असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो.
मिळालेल्या महितीनुसार तब्बल 410 करोड रुपये खर्चून बनलेल्या ब्रह्मास्त्रची पहिल्या तीन दिवसांची म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवारची कमाई होती अनुक्रमे 42 कोटी, 41.36 कोटी आणि 44.8 कोटी. त्यानंतर सोमवार आणि मंगळवारी याला लक्षणीय उतरती कळा लागली. या दोन दिवसांत कमाई होती अनुक्रमे 15.5 कोटी आणि 13 कोटी! अश्या प्रकारे पहिल्या पाच दिवसांत या चित्रपटाची कमाई होते 156.66 कोटी. म्हणजे एकूण 410 कोटी खर्चाचा अर्धा टप्पा सुद्धा अजून ब्रह्मास्त्रने गाठलेला नाहीये आणि कलेक्शन तर मोठ्या प्रमाणात खालावलं आहे.
सूत्रांकडून प्राप्त झालेले हे आकडे खरे मानले तर ब्रह्मास्त्र रेकॉर्डब्रेक कमाई करतोय हे विधान विचार करायला लावणारं आहे.
यातच आणखी एक मतप्रवाह असाही असल्याचं समजतं आहे की हा 410 कोटींचा सिनेमा असल्याचा दावा तरी खरा आहे का? की लोकांमध्ये क्रेझ निर्माण करण्यासाठी आणि पाहिल्याच आठवड्यात मोठी कमाई करण्यासाठी हे मोठं बजेट दाखवण्यात आलंय?
असो, जे काही आहे ते करण जोहर आणि कंपनीलाच माहीत.