नागपूर प्रतिनिधी :
दि. 19 सप्टेंबर 2022
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून पक्षबांधणीबाबत ते स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. यावेळी मनसेची नागपूर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला आहे. याआधी त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र ही सदिच्छा भेट असून यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, अशी माहिती दिली. बावनकुळे असे म्हणत असले तरी मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांशी जवळीक वाढलेली आहे असे दिसते. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी बावनकुळे यांची भेट घेणे या घटनेचे अनेक अर्थ लावले जात आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यादरम्यान मनसेच्या स्थानिक पदाधिकऱ्यांशी संवाद साधत आहेत. तसेच पक्षात स्थानिक पातळीवरील बदलांच्या दृष्टीने मोठे निर्णयही घेत आहेत. यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतील निवसस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली होती. राज्यात सत्तांतर झाल्यापासून भाजपा आणि मनसे यांच्यात जवळीक वाढलेली आहे. मागील काही दिवसांपासून भाजपाचे नेते आणि राज ठाकरे यांच्यातील बैठका वाढलेल्या आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे यांना मी याआधी जेव्हा भेटलो होतो, तेव्हा नागपुरात याल तेव्हा माझ्या घरी चहा घ्यायला या, असे मी त्यांना म्हणालो होतो. यामुळेच आज ते माझ्याकडे आले आहेत. ही भेट राजकीय नसून या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही. राज ठाकरे यांचा स्वभाव चांगला आहे आणि ते दिलदार मनाचेही आहेत. वैयक्तिक पातळीवर मैत्री जपणारे असे ते आहेत. अशा नेत्याशी कोणाचे व्यक्तिगत चांगले संबंध असतील तर त्यात काही गैर नाही. मागील १८ वर्षांपासून राज ठाकरे आणि माझ्यात मैत्रीचे संबंध आहेत. त्यांच्याकडे मी किंवा त्यांनी माझ्याकडे येणे यामध्ये राजकीय कारणच असायला पाहिजे हे जरूरी नाही. असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले.
मनसेने आपले काम सुरू केले आहे आणि त्यांचा पक्ष त्यांना वाढवण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तसेच भाजपाचे आपल्या पातळीवर काम सुरू आहे. राज ठाकरे स्पष्ट बोलतात. दिलदारपणे वागतात. प्रत्येक गोष्टीचा राजकीय संबंध असतोच असे काही नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.