मुंबई प्रतिनिधी :
दि. 15 ऑक्टोबर 2022 :
भारतीय जनता पक्षाचे औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला खिंडार पाडले आहे. काँग्रेस ओबीसी आघाडीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा. सुधीर पोतदार यांच्यासह औसा तालुक्यातील अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध आमदारांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
दरम्यान, प्रा. पोतदार यांनी वंचित बहुजन आघाडीकडून २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. या सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेशाचा सोहळा पार पडला.
भविष्यात औसा मतदारसंघासह लातूर जिल्ह्यात या पक्षप्रवेशामुळे भाजपला बळकटी मिळेल, असे आशावादी मत आमदार अभिमन्यू पवार यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले. तसेच त्यांनी पक्षप्रवेश केलेल्यांचे हार्दिक स्वागतही केले.
भाजपा मध्ये प्रवेश करणार्यांत काँग्रेस ओबीसी आघाडीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा. सुधीर पोतदार, उजनीचे युवा नेतृत्व प्रवीण कोपरकर, काँग्रेस ओबीसी विभागाचे औसा शहराध्यक्ष भागवत म्हेत्रे, काँग्रेसचे लातूर जिल्हा संघटक अॅड. अभय पाटील, जिल्हा कमिटी सदस्य भाऊराव पाटील, श्री अखिल भारतीय रुग्णहक्क संघर्ष समितीचे संस्थापक सदस्य निलेश करमुडी, हिप्परगाचे माजी सरपंच मोतीराम काटे, सरपंच इंद्रजीत घोडके, राष्ट्रीय बंजारा परिषदचे जिल्हा सचिव श्री सत्यनारायण राठोड, सामाजिक कार्यकर्ते बापूराव जगताप, बेलकुंडचे सरपंच विष्णू कोळी, येळीचे सरपंच बाबुराव धुमाळ, भंगेवाडी-महादेववाडीचे सरपंच अमोल पाटील, उजनीचे ग्रामपंचायत सदस्य संजय रंदवे, अनिल कळबंडे, शाम सूर्यवंशी, बालाजी वळके, माजी चेअरमन सिद्धेश्वर गंगणे व इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
या वेळी सहकारमंत्री अतुल सावे, भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, संघटनमंत्री संजय कोडगे, आमदार देवयानी फरांदे, आमदार श्वेता महाले, औसा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, लातूर जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.