मुंबई प्रतिनिधी :
दि. 15 ऑक्टोबर 2022 : महापुरामुळे उत्तरप्रदेशातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. यावरुन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विरोधकांनी धारेवर धरले आहे. शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवरुन मुख्यमंत्र्यांवर विरोधकांनी निशाणा साधला आहे. विरोधकांसोबतच भाजपच्या नेत्यांनीही भाजपला घरचा आहेर देऊ केला आहे.
उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांनी खासदार बृजभूषण सिंह यांचा हा व्हिडिओ टि्वट करीत भाजपवर सडकून टीका केली आहे.
रोहित पवार आपल्या टि्वटमध्ये म्हणताहेत, ‘परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजाचं दिवाळं निघालंय. त्याचे अश्रू पुसण्यासाठी आता राज्य सरकारने तातडीने पुढं यावं. यूपीतही अशीच स्थिती आहे. तिचं वर्णन खुद्द भाजप खासदार पैलवान बृजभूषणसिंह यांच्याच तोंडून ऐका’
“मी माझ्या उभ्या आयुष्यात महापुरादरम्यान असा ढिसाळ कारभार पाहिलेला नाही,” असे म्हणत अप्रत्यक्षपणे बृजभूषण सिंह यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. “आम्ही रडू शकत नाही आणि भावनाही व्यक्त करु शकत नाही. राज्यातील जनता तर रामभरोसे आहे. महापुराच्या परिस्थितीची माहिती असूनही लोकप्रतिनिधी बोलू शकत नाहीत. त्यांना फक्त ऐकावे लागते,” असे बृजभूषण सिंह आपल्या व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.