पुणे प्रतिनिधी :
दि. 14 डिसेंबर 2022
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी निषेध म्हणून आज पुणे शहरात विविध संघटनांनी बंद पुकारला होता. विविध संघटनांनी पुकारलेल्या या ‘पुणे बंद’ला व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला व कडकडीत बंद पाळला.
मात्र, दुसरीकडे या बंदमुळे शहरातील व्यवसाय एक दिवस बंद ठेवावे लागल्याचा सर्वाधिक फटका या व्यावसायिकांनाच बसला आहे. कपडे, सराफी बाजार, हॉटेल व्यवसाय, भुसार, भाजीपाला अशा वेगवेगळ्या व्यवसायांना मंगळवारी सुमारे ३३ कोटी रुपयांचा फटका बसला. या ‘पुणे बंद’मुळे व्यावसायिकांना सर्वाधिक आर्थिक झळ सोसावी लागल्याचे दिसते आहे.
शिवप्रेमींनी ‘पुणे बंद’च्या दिलेल्या हाकेला प्रमुख राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शहरातील गणेशोत्सव मंडळे, धार्मिक संघटना, व्यावसायिक व व्यापारी संघटना अशा एकूण २४ संघटनांनी पाठींबा दर्शवित या बंदमध्ये सहभाग घेतला होता.
या बंदला शहरातील व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे व्यावसायिकांना सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत तब्बल पाच ते सहा तास दुकाने बंद ठेवावी लागली. मंगळवार हा व्यावसायिकांच्या दृष्टीने महत्वाचा व व्यावसायाचा दिवस असतो. आर्थिक उलाढाल या दिवशी मोठ्या प्रमाणात होते. मात्र मंगळवारी बहुतांश व्यापारी, व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने व दुपारी तीन नंतर व्यवसाय कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेकांनी दिवसभर व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शहरातील कापड बाजारपेठेची दररोजची उलाढाल ८ ते १० कोटींची असते, त्यामध्ये कापड व्यावसायिकांचे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. सराफी बाजारपेठेच्या रोजच्या २५ कोटी रुपयांच्या उलाढालीच्या तुलनेत त्यांचे जवळ जवळ १२ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
याच पद्धतीने हॉटेल व्यावसायिक, पीएमपीएल, किराणा भुसार, फळ, भाजीपाला अशा व्यवसायांचे ३३ कोटी रुपयांचे नुकसान झाले. व्यावसायिकांना या ‘बंद’मुळे कोट्यावधी रुपयांची आर्थिक झळ सहन करावी लागली. त्याबाबत मंगळवारी विविध क्षेत्रांमध्ये दिवसभर चर्चा सुरु होती.
दरम्यान बंदच्यावेळी शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नसल्याचे समजते.