हवेली प्रतिनिधी :
दि. 17 डिसेंबर 2022
आरती युवराज वांजळे या आपले पती युवराज वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिरेगावात येत्या ग्रामपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदासाठी निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने सदर प्रतिनिधीने ग्रामस्थांशी संवाद साधला ग्रामस्थांचा कल त्यांच्याकडेच असल्याचे दिसून आले. अहिरेगावाचा बराच विकास यापूर्वी सरपंच या नात्याने युवराज वांजळे यांनी केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करणार्या आरती युवराज वांजळे गावाचा विकास आणखी जोमाने करतील असा विश्वास ग्रामस्थांनी बोलून दाखविला. युवराज वांजळे यांच्या लोकप्रियतेचा आणि त्यांच्या कामांचा फायदा आरताईताईंना होणार असे ग्रामस्थ बोलतात.
युवराज वांजळे यांनी आरओ फिल्टर कार्यान्वित करून ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळवून दिले. तसेच इलेक्ट्रिक पोल, डीपीची कामे करून गावाचा विजेचा प्रश्न सोडविला. पिठाच्या गिरणीची सुरुवात करून ग्रामस्थांना भेडसावणारा दैनंदिन आयुष्यातला प्रश्न त्यांनी सोडवला. युवराज वांजळे यांच्या लोककल्याणाच्या कामांचे स्मरण ग्रामस्थांना आहे. आपुलकीचे नाते ग्रामस्थांबरोबर निर्माण झाल्याने त्यांच्याच मार्गावर चालणार्या आरती युवराज वांजळे यांना त्याचा फायदा मिळेल असे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. अहिरेगावाचा विकास अधिक परिणामकारकरित्या साधण्यासाठी आरती युवराज वांजळे याच सरपंचपदासाठी उत्तम पर्याय आहेत असे ग्रामस्थ एकसुरात बोलताना आढळले. ग्रामस्थांनी त्यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान, त्या आपल्या पतीच्याच पावलावर पाऊल टाकून वाटचाल करतील आणि गावाचा उत्कर्ष असाच अबाधित राखतील, असे स्पष्ट मत नोंदवले. स्व. आमदार रमेश वांजळे यांचा आशीर्वाद आणि त्यांची प्रेरणा घेऊन अहिरेगावाच्या कल्याणासाठी आरतीताई उज्ज्वल कामगिरी करतील अशी पक्की खात्री सर्वांना आहे. उद्देश चांगला तर यश आपलेच असे तत्त्व जपणार्या आरतीताईच सरपंचपदासाठी अतिशय योग्य आहेत असे ग्रामस्थ ठामपणे सांगत आहेत.