हवेली प्रतिनिधी :
दि. 17 डिसेंबर 2022
कदमवाकवस्तीच्या महिला सरपंच गौरी चित्तरंजन गायकवाड यांच्या वक्तव्यानुसार कोरोना लसीकरणाच्या काळात, त्यांना लोकप्रिय करणारे त्यांचे सामाजिक कार्य न बघवले गेल्यामुळे सुजीत काळभोर याने बेदम मारहाण केली होती. त्यावेळी हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून जो व्हिडिओ सध्या व्हायरल करण्याचा प्रयत्न होतोय तो, गौरी गायकवाड यांना झालेल्या मारहाणीनंतरचा व्हिडिओ आहे असे सूत्रांकडून तसेच गौरी गायकवाड यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीनुसार समोर येते आहे. गौरी चित्तरंजन गायकवाड यांच्या मते त्यांना आधी मारहाण झाली. खुर्चीवरून खाली पडण्यात आलं. हात पिरगाळण्यात आला. विशेष म्हणजे हे सर्व त्यांना झालेल्या मारहाणीच्या व्हिडिओमध्येसुद्धा स्पष्ट दिसते आहे. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की आत्ता जो व्हिडिओ पसरवला जातोय तो नंतरचा आहे. त्यांना झालेल्या मारहाणीच्या क्रियेची ती नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याचा पुरावा म्हणून त्या म्हणतात की “मी आधी मारहाण केली असती अथवा करवली असती तर मला मारहाण करतानाच्या व्हिडिओमध्ये सुजीत काळभोर यांचा गॉगल, मास्क हे व्यवस्थित जागेवर कसे आहेत? मारहाण आम्ही आधी केली असती तर गॉगल नक्कीच फुटला असता अथवा खाली तरी पडला असता.” त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे आधी त्यांनाच मारहाण झाली होती असे समजण्यास वाव आहे. गौरी गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार हा नवा व्हिडिओ म्हणजे आपली कृष्णकृत्ये झाकण्याचा सुजीत काळभोर यांचा एक लाजिरवाणा प्रयत्न आहे.