हवेली प्रतिनिधी :
दि. 17 डिसेंबर 2022
कदमवाकवस्तीच्या महिला सरपंच गौरी चित्तरंजन गायकवाड यांच्या अथक प्रयत्नांतून आणि त्यांचे पती चित्तरंजन (नाना) गायकवाड यांच्या अनुभवी मार्गदर्शनातून, कदमवाकवस्तीत तब्बल 90 कोटींची पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होते आहे. या योजनेमुळे ग्रामस्थ आनंद साजरा करत असतानाच मागील पाच वर्षांच्या काळातील, या पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील एका ऑडिओने गावात धुमाकूळ घातला आहे. हा ऑडिओ जनसेवा पॅनलप्रमुखांपैकी एकाचा असल्याचे गावकरी दबक्या आवाजात बोलत आहेत. या ऑडिओत पाणीपुरवठा योजना मंत्रालयातून मंजूर करून आणण्यासाठी, एकूण योजना रकमेच्या चक्क 50% लाच मागितली गेली आहे. म्हणजे थोडे थोडके नाही तर तब्बल 40 ते 45 कोटी रुपये या ऑडिओतील व्यक्तीला ही योजना गावासाठी आणण्याच्या बदल्यात अपेक्षित आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे कॉल रेकॉर्डिंग जनसेवा पॅनलप्रमुखांपैकी एकाचे असल्याने त्या पॅनलची मात्र ऐन निवडणुकांच्या तोंडावर पंचाईत झाली आहे. निवडणुका उद्यावर येऊन ठेपल्या आहेत आणि त्यांना उत्तरं देताना आणि सारवासारव करताना नाकी नऊ आले आहेत. तसेच प्रचंड नामुष्कीचा सामनाही करावा लागत आहे. या व्हायरल होणार्या ऑडिओमुळे जनसेवा पॅनल बॅकफूटवर गेल्याचे बोलले जात आहे. याचा फायदा नवपरिवर्तन पॅनलला नक्कीच होणार असे ग्रामस्थांच्या बोलण्यातून जाणवते आहे.