मुंबई प्रतिनिधी :
दि. 29 डिसेंबर 2022
‘बेशर्म रंग’ या गाण्यामुळे वादाच्या भोवर्यात सापडलेला शाहरुख खान आणि दीपिका पादुकोनचा चित्रपट ‘पठान’ आता सेन्सॉरकडूनही संमत होण्यास अडचणी येत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील बर्याच दृश्यांना तसेच ‘बेशर्म रंग’ या गाण्यातील दृश्यांना हरकत घेतली आहे. CBFC अर्थात ‘सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’चे अध्यक्ष प्रसून जोशी हे आहेत व त्यांनी स्वतः बॉलीवूड मध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे ते गीतकार असून त्यांनी आमीर खान व शाहरुख खानसाठी गाणी लिहिलेली आहेत. त्यामुळे ‘बेशर्म रंग’ या गाण्यातील दृश्यांना त्यांनी घेतलेल्या हरकतीला अर्थ आहे असे बोलले जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही कोणत्याही धर्माच्या भावना दुखावत असेल तर ते गैरच आहे असाही एक सूर ऐकायला मिळतो आहे. बॉलीवूडला केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदू धर्मच दुखावण्यासाठी, चेष्टा करण्यासाठी कसा सुचतो, असाही संतप्त सवाल जनता विचारते आहे. स्वतः प्रसून जोशींनी बॉलीवूडसोबत काम केलेले असल्याने व त्यांना त्यातल्या प्रक्रियेची माहिती असल्याने तसेच सेन्सॉर संमत होणार्या गोष्टी कुठल्या व न होणार्या कुठल्या हे ते जाणून आहेत असा एक मतप्रवाह पाहायला मिळतो आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाला आव्हान दिले जाणे अवघड आहे. तरीही ते दिले जाणार का? दिले तर ते स्वीकारले जाणार का? असे प्रश्न उभे ठाकले आहेत. त्यामुळे येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणारा ‘पठान’ वेळेत प्रदर्शित होण्याची शक्यता धूसर झाली आहे.