पुणे शहरः प्रतिनिधी,
दि. १९ एप्रिल २०२३
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आजपर्यंत कधीही आडतदार व विक्रेता यांनी एका पॅनलच्या माध्यमातून निवडणुक लढविली नव्हती. मात्र, येत्या 28 एप्रिल रोजी संपन्न होत असलेल्या निवडणुकीसाठी आडते अशोक रामभाऊ गावडे व विक्रेत्याचे प्रतिनिधी उमर बागवान हे परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आडते-व्यापारी संघातून निवडणूक लढवित आहेत. यावर्षीच्या निवडणुकीत पथारीवाले, विक्रेते व हातगाडीवाले सर्वाधिक मतदार आहेत.
अखिल भारतीय जाणीव संघटना, पुणे पुरस्कृत परिवर्तन पॅनल असंघटितांच्या हितासाठी निवडणुक लढवित आहे. तब्बल १९ वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक संपन्न होत आहे. त्यामुळे उमेदवार व मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बाजार समितीसाठी एकुण १८ संचालक प्रतिनिधी निवडले जातात. त्यापैकी २ प्रतिनिधी हे आडते व व्यापारी मतदारसंघातून निवडले जातात.
आजपर्यंत बहुतांशी आडते उमेदवारच या मतदारसंघातून एकत्रित निवडून गेले आहेत. मात्र, बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच या निवडणुकीत एक आडते उमेदवार दुसरा विक्रेत्यांचा प्रतिनिधी एकत्रित येऊन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. आडते आणि विक्रेते यांच्या एकत्रिकरणाने या निवडणुकीत ऐतिहासिक घटना घडली आहे. यामुळे एक नवीन स्वागतार्ह पायंडा पडला आहे असाच बहुतेकांचा सूर असल्याचे पाहावयास मिळाले. या निवडणुकीत हातगाडी, स्टॅालधारक, पथविक्रेते यांना परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सामावून घेतलं आहे.
अशोक रामभाऊ गावडे हे आडते असोसिएशन मार्केटयार्ड, पुणे चे मा. संचालक आहेत. शिवाय महात्मा फुले को-ऑप. सोसायटी, मुंबईचे ते उपाध्यक्ष आहेत. याशिवाय बरीच महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत. यावरून त्यांना विविध पदांवर काम करून यशस्वी नेतृत्त्वाचा अनुभव असल्याचे दिसून येते. 1994 पासून ते मार्केट यार्डमध्ये केळी व्यापारी म्हणून व्यवसाय करीत आहेत. ते बीएस्सीचे पदवीधर असून आपल्या सहकार्यांमध्ये लोकप्रिय आहेत. अंकुश अण्णा काकडे व शांतीललजी सुरतवाला यांसारख्या मित्रांमुळे त्यांना समाजकारणाची आवड निर्माण झाली. व्यवसाय करत असतानाच गावडे यांनी केळी व्यापार्यांच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत. महात्मा फुले को-ऑप. सोसायटी, मुंबईचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी किरकोळ व्यापारी व आडते यांना कर्ज मिळवून देऊन त्यांच्या तातडीच्या गरजा पूर्ण केल्या आहेत. या सर्व गोष्टींमुळे ते अतिशय लोकप्रिय आहेत व कार्यकुशल अशी त्यांची सहकार्यांमध्ये ओळख आहे.
गावडे यांनी ज्या उमर बागवान यांच्याशी एकत्रीकरण केले आहे ते अखिल भारतीय जाणीव संघटना, पुणे चे कार्यवाह आहेत. गेल्या 20 वर्षांपासून त्यांचा सामाजिक परिवर्तन चळवळीत सक्रिय सहभाग आहे. समाजातील हातगाडी, फेरीवाले, पथविक्रेते यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी विविध आंदोलनांत ते सक्रियपणे सहभागी झालेले आहेत. ते बीए. डीएड ची पदवी प्राप्त केलेले सुशिक्षित उमेदवार आहेत आणि सहकार्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
अश्या तर्हेने गावडे व बागवान यांसारख्या सुशिक्षित, अनुभवी तसेच आडते आणि विक्रेते यांच्या भरभराटीची तळमळ असणार्या उमेदवारांच्या एकत्र येण्याने, कृषि उत्पन्न बाजार समितीच्या 2023 ते 2028 च्या सार्वत्रिक निवडणुकीत आडते – व्यापारी संघातून त्यांचा विजय सुनिश्चित मनाला जात आहे.