नागपूर प्रतिनिधी :
दि. १९ एप्रिल २०२३
नागपुरात रविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेनंतर राजकीय समीकरणे बदलल्याचे बोलले जात आहे. जेथे ही सभा झाली, त्या पूर्व नागपुरातील समीकरणे विशेष करून मोठ्या प्रमाणात बदलली. महाविकास आघाडीला येथे भाजपला पराभूत करणे तितकेसे अवघड नाही असा अंदाज बांधला जात आहे. पण कोणत्या पक्षाचा उमेदवार येथून भाजपला टक्कर देईल, यावर पुढील गोष्टी अवलंबून असतील.
पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दावा करणार असल्याचे बोलले जात आहे. पण त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे इच्छुक आहेत ते कमालीचे नाराज झाले आहेत असे सूत्रांकडून समजते. मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी पूर्व नागपूर मतदारसंघ मिळविण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे चांगलाच जोर लावण्यात आला होता.
त्यावेळी शेवटपर्यंत वाटाघाटी सुरू होत्या. काँग्रेसचे काही नेते त्यासाठी राजीसुद्धा झाल्याचे दिसले होते. मात्र काँग्रेसने राष्ट्रवादीच्या नेत्यांना गाफील ठेवून शेवटच्या क्षणी आपला डाव साधला. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे खंदे समर्थक पुरुषोत्तम हजारे यांना उमेदवारी दिली गेली.
हा मतदारसंघ मिळवता आला नाही याची सल अनेकदा राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विविध बैठका आणि सभांमधून बोलून दाखविली आहे. यात आपलीच चूक झाली, असेही ते म्हणाले होते. यापुढे असे घडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी राष्ट्रवादीच्या संपर्क यात्रेदरम्यान झालेल्या बैठकांमधून दिले आहे. त्यामुळे अनेकजण विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागले आहेत.
या भागाचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे हे आहेत. त्यांनासुद्धा हा मतदारसंघ अनेक वर्षांपासून खुणावत आहे. शहराध्यक्ष झाल्यानंतर तर त्यांनी आपली सारी ताकद व राष्ट्रवादीची यंत्रणा पूर्व नागपूरमध्ये लावली आहे. पूर्व आणि मध्य नागपूरच्या टोकावर राहात असलेल्या नगरसेविका आभा पांडे यांनादेखील पूर्वमध्येच रस असल्याचे दिसते आहे. येथेच त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमदेखील झाला होता.
राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगेच महिला आयोगाच्या सदस्यपदी, पक्ष प्रवेशानंतर आभा पांडे यांची नियुक्ती केली. महाविकास आघाडीची स्थापना आणि रविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. सतीश चतुर्वेदी यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आजही येथे आहेत. पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाही दावा करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अशी एकंदर परिस्थिती असल्याने महाविकास आघाडीतच या जागेसाठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.