पुणे प्रतिनिधी :
दि. २० एप्रिल २०२३
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक येत्या २८ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. यामध्ये खरी चुरस आहे ती राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्र पक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी पॅनलमध्ये. या निवडणुकांचा कल पहाण्यासाठी मार्केट परिसरात फेरफटका मारून मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे प्रतिस्पर्धी असलेल्या पॅनलबाबत लोकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले. नाराजीचे कारण जाणून घेतले असता बर्याच लोकांनी आपला संताप रोखठोक बोलून व्यक्त केला. भ्रष्टाचार, बंडखोरी, भुलथापा यांनी संपूर्ण व्यापलेले हे लोक काय आमचं भलं करणार असाच सूर जागोजागी ऐकू आला. खोटी आश्वासने देऊन, मते घेऊन नंतर तोंडाला पाने पुसणे हे यांच्या अंगवळणी पडले आहे असे मत कित्येक लोकांनी व्यक्त केले. शिवाय हे ओरिजिनल नाहीत, मिक्सिंग झालेले, आपापल्या पक्षांशी बंडखोरी करून स्वार्थापोटी एकत्र आलेले आहेत असेही लोक बोलले. यांना निवडून देऊन काहीही साध्य होणार नाही हे माहीत असताना आम्ही चुकीच्या लोकांना मते का देऊ? असा प्रतिप्रश्न सदर प्रतिनिधीला लोकांनी केला. आम्हाला समस्यांना तोंड देतच राहावे लागेल आणि गुमान आपला व्यवसाय करावा लागेल असा स्पष्ट सूर मतदारांचा ऐकायला मिळतो आहे.
एका व्यक्तीची या संदर्भातली प्रतिक्रिया प्रातिनिधीक आणि खूपच बोलकी होती. तो म्हणाला, “आज मार्केटमध्ये ठिकठिकाणी गैरसोयींनी शेतकरी त्रस्त झाले आहेत. बाजारात येणार्या शेतीमालाचे जतन करण्याच्या परिणामकारक योजना नाहीत. त्यामुळे त्यांना मालाची नुकसानी सहन करावी लागते आहे. यामुळे अतोनात आर्थिक नुकसानही होते आहे. यावर काहीही ठोस पावले न उचलता केवळ स्वार्थाने धुंद झालेले लोक आम्ही मुळीच निवडून आणणार नाही.”
गेल्या १९ वर्षांत समितीची निवडणूक झालेली नसल्याने प्रशासकीय कारभार चालू होता. २० वर्षांपूर्वी तत्कालीन संचालकांनी प्रचंड घोटाळे केल्याने बाजार समिती बरखास्त करण्यात आली होती हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे या संस्थेचे अतोनात नुकसान झालेले आहे असे लोक स्पष्टपणे बोलतात. त्यावेळी ज्यांनी घोटाळे केले तेच आज पुन्हा निवडणूक लढवित आहेत. सत्तेसाठी हे एकत्र आलेले आहेत. त्यांची ही वृत्तीच त्यांचे मनसुबे उघड करते आहे असे लोकांचे ठाम मत आहे.
मतदारांशी साधलेला संवाद, त्यांची जाणून घेतलेली मते यांवरून, राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्र पक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचा विजय, या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०२३ ते २०२८ सार्वत्रिक निवडणुकीत निश्चित वाटतो आहे.