पुणे प्रतिनिधी :
दि. 21 एप्रिल 2023
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी संपन्न होत होत आहे. सेवा सहकारी मतदारसंघ व ग्रामपंचायत मतदारसंघ या दोन्हींमधून अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे एकूण १५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यात सेवा सहकारी मतदारसंघाचे ११ तर ग्रामपंचायत मतदारसंघाचे ४ उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्र पक्ष पुरस्कृत या पॅनलच्या प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आला.
शिरूर हवेली मतदार संघाचे आमदार अशोकबापू पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत, वाडेबोल्हाई येथे बोल्हाईमाता मंदिराच्या आवारात हा शुभारंभ झाला. यावेळी मतदारांचा प्रचंड प्रतिसाद अनुभवास आला. याप्रसंगी लोटलेली गर्दी अण्णासाहेब सहकार पॅनलच्या विजयाची साक्ष देत होती. यावेळी इतर मान्यवरांबरोबरच आमदार अशोकबापू पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी अशोक बापूंनी पॅनलच्या नियोजित कामांची कल्पना उपस्थितांना दिली. शेतकर्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त कामे राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्र पक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल करेल असे त्यांनी नमूद केले. पॅनलचे सर्वाच्या सर्व १५ उमेदवार हे पहिल्यांदाच हवेली मार्केट कमिटीची निवडणूक लढवित असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. हवेली मार्केट कमिटी संपूर्ण आशिया खंडात वरचढ करून दाखवू, त्यासाठी आम्हाला सर्व कोरे, कुठलाही डाग नसलेले, तरुण उमेदवारच उभे करायचे होते आणि अशी विनंती आपण अजितदादा पवार यांना केली होती या त्यांच्या विधानाने उपस्थितांची माने जिंकली. संस्था आपल्या ताब्यात आल्यानंतर आपण अतिशय प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे असंही ते म्हणाले.
या प्रचार शुभारंभात पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर व इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रदीप गारटकर म्हणाले की पक्षाला बळकटी देणारं आणि मार्केट कमिटीचं काम कसं असावं याचा आदर्श घालून देणारं असं हे अण्णासाहेब सहकार पॅनल सन्माननीय अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली उभं राहिलं आहे. यावेळी आपल्या बोलण्यातून सहकार क्षेत्रात भ्रष्ट कारभार करणार्या लोकांवरही त्यांनी जबरदस्त हल्ला चढवला. पुणे जिल्ह्याच्या यशोगाथेचे शिल्पकार शरद पवार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. संपूर्ण आशिया खंडातली क्रमांक १ ची मार्केट कमिटी असलेली हवेली मार्केट कमिटी भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अण्णासाहेब मगर सहकार पॅनल कटिबद्ध असेल असे त्यांच्या बोलण्याचे सार होते.
एकंदरीत राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्र पक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ अतिशय लक्षवेधी ठरला ज्याला मतदारांचा, कार्यकर्त्यांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.