पुणे प्रतिनिधी
दि. २४ एप्रिल २०२३ :
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनल जोरदार प्रचार करीत आहेत. मात्र, आधी सर्वपक्षीय म्हणून संबोधली जाणारी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी ही भाजप प्रणित छुपा पॅनल असल्याचे मतदारांच्या हळूहळू लक्षात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलचा खरा चेहरा समोर आल्याने शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा मतदार काय निर्णय घेतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
या बाजार समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल, सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने गेल्या काही महिन्यांपासून आमचा सर्वपक्षीय पॅनल आहे म्हणून लोकांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला होता. अण्णासाहेब मगर विकास आघाडी सर्वपक्षीय आहे असं नेतेमंडळी ओरडून सांगत होते, मात्र हा पॅनल सर्वपक्षीय नसून भाजपप्रणित छुपा पॅनल असल्याचे आता हळूहळू मतदारांच्या समोर येत आहे. थोडक्यात विजयासाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात खोट्या पद्धतीने केलेला बनाव अण्णासाहेब मगर विकास आघाडीच्या नेतेमंडळींच्या चांगलाच अंगलट येणार असं चित्र दिसत आहे. जसजशी प्रचारात रंगत येत आहे तसतसे या पॅनलचे खरे रुप लोकांसमोर येत आहे.
आपण जर भाजपप्रणित पॅनल मधून लढतोय हे मतदारांना समजले तर मतदार साथ देणार नाहीत याची कल्पना भाजपला जाऊन मिळालेल्या राष्ट्रवादीच्या काही नेतेमंडळी व उमेदवारांना होती. म्हणून त्यांनी सुरुवातीपासून मतदारांसमोर जाताना सर्वपक्षीय पॅनलचा मुखवटा पांघरला होता. परंतु, राष्ट्रवादीतील काहींना सोबत घेऊन पवार यांच्या जिल्ह्यात पवारांना धोबीपछाड द्यायचा हा गेम भाजपाने आखला आहे. अण्णासाहेब मगर विकास आघाडी या पॅनलची सर्व सूत्रे भाजपाच्या गोटातून हालवली जात आहेत हे आता हवेलीकरांच्या पूर्ण लक्षात आलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल सेफ झोन मध्ये आल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे.
तसेच पक्षाने एवढं देऊनही तुम्हाला भाजपच्या जवळ जाण्याची गरज का गरज भासते? असा सवाल राष्ट्रवादीचे बंडखोर विकास दांगट यांना हवेलीतील महाविकास आघाडीचा प्रत्येक मतदार विचारत आहे. शरद पवार यांच्या जिल्ह्यातील हवेलीसारख्या अतिशय महत्वाच्या तालुक्यात तुम्ही राष्ट्रवादी भाजपमध्ये घेऊन चालल्याचा आरोप राष्ट्रवादीची नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत. महाराष्ट्रात भाजपविरोधी वातावरण असताना तसेच मतदारांमध्ये भाजपविषयी रोष असताना भाजपच्या पॅनलमधून लढण्याचं कारण काय आहे. जर दांगट हे भाजपप्रणित पॅनलला साथ देत असतील तर त्यांची पक्षातून हाकलपट्टी करावी असा सूर राष्ट्रवादीतील मतदारांमध्ये उमटत आहे. तेव्हा, राष्ट्रवादी काँग्रेसचा कट्टर असलेला ८० टक्के मतदार ख-या राष्ट्रवादीच्या पॅनलला मतदान करेल की भाजपप्रणित पॅनलला साथ देईल हे २९ तारखेला समजणार आहे.