पुणे प्रतिनिधी :
दि. २५ एप्रिल २०२३
पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करीत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी जाहीर केले. त्यांनी हा निर्णय का घेतला हे त्यांच्याच शब्दांत…
“उद्याच्या २८ एप्रिल रोजी होत असलेल्या पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती, हवेली पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विकास दांगट हे पक्षविरोधी भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पॅनलच्या विरोधात काम करत असल्याने मी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हाकालपट्टी करीत आहे.
एक वर्षापूर्वी झालेल्या पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रकाश म्हस्के व दांगट यांची मैत्रीपूर्ण लढत झाली होती. दोघेही राष्ट्रवादीचे परंतु त्यांच्यात एकमत होत नसल्याच्या कारणावरुन शेवटच्या क्षणी नाईलाजास्तव हा निर्णय पक्षाला घ्यावा लागला होता. त्या निवडणुकीत पक्षाच्या अनेक मान्यवरांनी दांगट यांचे उघडपणे काम केले होते. त्यामुळेच ते विजयी झाले होते, याची जाणीव दांगट यांनी ठेवलेली दिसत नाही.
१९ वर्षांनंतर होत असलेल्या बाजार समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत पॅनल उभा करण्याचा आदेश दिला होता. दादांच्या आदेशानुसार मी स्वतः अनेक वेळा दांगट यांच्याशी पॅनल करण्याविषयी चर्चा केली. परंतु, त्यांनी कायम भाजपच्या काही उमेदवारांसाठी आणि मागील संचालक मंडळात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता, त्यांच्यासाठी आग्रह धरला.”
प्रदीप गारटकर पुढे म्हणतात, “सन्माननीय अजित दादांनी भ्रष्टाचाराचे आरोप असणारे सोडून विकास दांगट यांना त्यांच्या घरातील सदस्यांना उमेदवारी देण्याची मुभा सुद्धा देऊ केली होती. तसेच त्यांनाच पॅनल करण्याविषयी पुढाकार घ्यायला सांगितला होता. दादांच्या आदेशाने मी त्यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून पक्षाचा पॅनल उभा करण्याविषयी चर्चा करीत होतो, त्यांनी मात्र यात वेळकाढूपणाची भूमिका घेतली शिवाय या निवडणूक प्रक्रियेत पक्षाला गाफिल ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अक्षरशः फसवणूक केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हवेली तालुक्यात ग्रामपंचायत व सोसायटी विभागात प्राबल्य असून ही निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत सोपी होती. असे असताना आणि त्यांच्याकडे पक्षाच्या पॅनलबाबत सातत्याने विचारणा केली जात असताना त्यांनी असा पक्षाला सोडून निर्णय का घेतला, याचा विचार केला असता, त्यांची भाजपशी जवळीक झाल्याचे लक्षात आले.
गेले दोन महिने अजितदादांविषयी चुकीच्या बातम्या पेरुन सर्वांची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. आदरणीय शरद पवारसाहेबांच्या जिल्ह्यात पक्षाच्या अधिकृत पॅनल विरोधात जाऊन पक्षालाच आव्हान देण्याची भूमिका घेणं हे अंत्यत चुकीचं आहे, पक्षाची शिस्त सर्वांसाठी बंधनकारक आहे.
पक्षविरोधी कारवायांबद्दल मी पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने पीडीसीसी बँकेचे संचालक माजी नगरसेवक विकास दांगट यांची पक्षातून हकालपट्टी करीत आहे. तसेच हवेली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते देखील जे पक्षविरोधी भूमिका घेऊन काम करतात, त्यांना आवाहन करतो आपण कृपया पक्षविरोधी कारवाया थांबवाव्यात, आपणांवर देखील कारवाई करावी लागेल.”