पुणे प्रतिनिधी
दि. २६ एप्रिल २०२३ :
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्ताने जोरदार रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल व अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आपलीच सत्ता यावी म्हणून दोन्ही पॅनलने जोरदार तयारी केली आहे. मात्र, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे डेंजर झोनमध्ये असल्याचे दिसून येत आहे.
बाजार समितीची निवडणूक तब्बल २० वर्षांनंतर संपन्न होत असल्याने तिला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकांची वाट पाहून हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्रात काम करणारी एक पिढी वयोवृद्ध झाली. त्यामुळे, सध्या होत असलेल्या निवडणुकांमुळे सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही पॅनल्सचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे केले जात आहेत.
ज्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे १९ वर्ष प्रशासकराज लादले गेले त्याच तत्कालीन संचालकांना अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलने भ्रष्ट्राचाराच्या विषयावरुन हवेली तालुक्यात राळ उठविली आहे. त्याचे पडसाद भ्रष्टाचाराची चीड असणा-या मतदारांमध्ये उमटत आहेत. त्यामुळे अण्णासाहेब मगर विकास आघाडीस सबुरीची भूमिका घ्यावी लागत आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलने उच्चशिक्षित, तरुण व मातब्बर उमेदवार दिले आहेत.
त्यामुळे पहिल्यांदा प्रचारात आघाडी घेतलेली अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी बॅकफुटवर गेल्याचे चित्र दिसून येत आहे. तेंव्हा, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला भ्रष्टाचाराचा कलंक भोवणार असल्याचे सध्यातरी स्पष्ट दिसत आहे.