पुणे, राजकीय प्रतिनिधी
दि. २७ एप्रिल२०२३ :
एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची सध्या जोरदार रणधुमाळी सुरु आहे. जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी मित्रपक्ष पुरस्कृत पॅनलचे सोसायटी गटातून आठ व ग्रामपंचायत गटातून चार उमेदवार आघाडीवर असल्याची सध्या परिस्थिती आहे. त्यामुळे अतिशय प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपप्रणित पॅनलसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
तब्बल २० वर्षांनंतर बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत आहे. बाजार समिती गेली १९ वर्ष प्रशासकाच्या ताब्यात होती. त्यामुळे या निवडणुकीला एकप्रकारे विशेष महत्व आहे. पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचा कारभार पाहण्यासाठी एकूण १८ संचालक निवडले जातात. विकास सेवा सोसायटी गटातून ११, ग्रामपंचायत गटातून ४, व्यापारी -आडते गटातून २ व हमाल मापाडी गटातून १ अशा विविध गटातून ते त्या विभागाचे प्रतिनिधित्व करतात.
या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल, भाजपप्रणित अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी व अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. एक वर्षापूर्वी झालेल्या पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीपासून भाजप प्रणित शेतकरी विकास आघाडीने प्रचाराची सुरुवात केली होती. इच्छुकांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाचे उमेदवार जाहिर होण्यास खुप विलंब झाला होता. त्यामुळे चिन्ह मिळेपर्यंत भाजप प्रणित पॅनलने तसं पाहता प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र, २१ एप्रिल पासून राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पॅनलने प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजप प्रणित पॅनलवर मात केल्याचे दिसून आले. या निवडणुकीत साम, दाम, दंड भेदचा वापर दोन्ही पॅनलच्या वतीने करुन निवडणूक जिंकण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले जात आहेत.
शेवटच्या टप्यात राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पॅनलने जोरदार पुनरागमन केल्यामुळे त्यांचे विकास सेवा सोसायटी गटातून जवळपास ८ उमेदवार व ग्रामपंचायत गटातून ४ उमेदवार आघाडीवर आहेत. दोन दिवसात जर आणखी थोडा जोर राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाच्या पॅनलने लावला तर त्यांना १५-० अशा फरकाने ही निवडणुक जिंकता येऊ शकते. भाजपप्रणित पॅनलचे विकास सेवा सोसायटी गटातून ३ -४ उमेदवार व ग्रामपंचायत गटातून १ उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे भाजप प्रणित पॅनलसाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पॅनलमधून सरला बाबुराव चांदेरे, प्रतिभा महादेव कांचन, शेखर म्हस्के, सचिन घुले, संतोष कांचन, संदिप गोते, अशोक गायकवाड, योगेश शितोळे हे उमेदवार आघाडीवर आहेत. तसेच ग्रामपंचात गटातून रामकृष्ण सातव, राहुल काळभोर, नवनाथ पारगे व नानासाहेब आबनावे हे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपप्रणित पॅनलमधून नितिन दांगट, रोहिदास उंद्रे, दिलीप काळभोर हे आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. काही चमत्कार झाल्यास प्रकाश जगताप ही विजयी होऊ शकतात. तसेच ग्रामपंचात गटातून शु्क्राचार्य वांजळे व रविंद्र कंद या दोघांपैकी एक उमेदवार थोड्याफार मतांनी विजयी होण्याची शक्यता आहे.
तेंव्हा, प्रचंड चुरशीच्या निवडणुकीत भाजप प्रणित पॅनल बॅकफुटवर गेल्याचे मतदानाच्या आधीच दिसत आहे. तसं पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हवेली तालुक्यात मोठी ताकद आहे, जवळपास ८० टक्के ग्रामपंचायती व ८० सोसायटी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत. मात्र, राष्ट्रवादीतील काहींमुळे भाजप प्रणित पॅनलला ताकद मिळाली होती. परंतु, शेवटच्या टप्यात ती ताकद फोल ठरल्याचे दिसत आहे. भाजप प्रणित पॅनलमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संगितले की अजित दादांनी आम्हाला पॅनल करण्यास सांगितले आहे आणि हीच त्यांची खरी ताकद होती. मात्र, अजित दादांनी दांगट यांची थेट हाकालपट्टी केल्याने कट्टर राष्ट्रवादीचा मतदार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पॅनलकडे वळल्याचे शेवटच्या टप्यात दिसून आले. दांगट यांची हाकालपट्टी हाच राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पॅनलचा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक असल्याचे या निवडणुकीत दिसून येत आहे.