पुणे प्रतिनिधी :
दि. 28 एप्रिल 2023
तब्बल १९ वर्षांनंतर होत असलेल्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे मतदान आज २८ एप्रिलला सकाळी सुरू झाले आहे. मतदारांचा प्रचंड ओघ सर्वच केंद्रांवर पाहायला मिळतो आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल, विकास आघाडी पॅनल, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती. हमाल मापाडी मतदार संघ, आडते व्यापारी मतदार संघ आणि अपक्ष असे उमेदवार रिंगणात आहेत. बाजार समितीच्या संचालकपदासाठी एकूण १८ जागांसाठी मतदान सुरू आहे. यात सेवा सहकारी संस्थेचे ११, ग्रामपंचायतीचे ४, आडते व्यापारी संघाचे २ आणि हमाल मापाडी संघाचा १ प्रतिनिधी असतो.
या निवडणुकांभोवती एक वेगळे वलय निर्माण झाले आहे त्याचे कारण म्हणजे तब्बल १९ वर्षांनी कृषि उत्पन्न बाजार समितीचा कारभार प्रशासकांकडून पुन्हा संचालकांकडे येणार आहे. गेली कित्येक वर्षे सर्वजण या निवडणुकांची वाट पाहात होते. आता ही वाट पाहाण्याची कारणे प्रत्येकाची वेगळी होती हे सर्वजण जाणतात आणि हीच कारणे मतदारांना निर्णय घेण्यास उपयोगी पडणार आहेत. सर्वांच्या कल्याणाचा ध्यास घेतलेल्या पॅनललाच लोक मतदान करतील हे निश्चित.
ही निवडणूक अतिशय अटीतटीची होत असल्याचे मतदारांच्या प्रतिसादामुळे दिसून येत आहे. आपणच जिंकू असा आत्मविश्वास प्रत्येकजण बाळगून आहे. पण प्रचाराच्या वेळी मतदारांचा पाठिंबा कुणाला होता, कुणी आयत्यावेळी आपल्या लोकांना अंधारात ठेवून वेगळी वाट धरली, कोण स्वार्थासाठी लढतोय आणि कोण परमार्थ साधणार याच गोष्टी शेवटी निर्णायक ठरणार आहेत हे नक्की.