विशेष राजकीय प्रतिनिधी : डीडी न्युज मराठी
पुणे : 18 July 2020
मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात पुणे पदवीधर मतदारसंघ हा पॅावरफुल्ल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्याचा व महाराष्ट्रात समृध्द परिसर म्हणून ओळख असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व पुणे या पाच जिल्ह्यांचा ही या मतदारसंघात समावेश होतो. त्यामूळे या मतदारसंघातील निवडणूका नेहमीच चुरशीच्या व अटीतटीच्या राहिल्या आहेत. या मतदारसंघाचे आजपर्यंत अनेक दिग्जांनी नेतृत्व केलं आहे. केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर, कुपवाड-सांगलीतील जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील व माजी मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात बच्चू पाटील आदींनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. गेल्यावेळच्या निवडणूकीत सलग दुस-यांदा चंद्रकांत पाटील विजयी झाले होते, मात्र, विधानसभा निवडणूकीत चंद्रकांत पाटील हे कोथरुड मतदारसंघातून निवडून गेल्यामूळे सात ते आठ महिने हि जागा रिक्त होती.
तसेच एकेकाळी सांगली जिल्ह्याचा राजकारणाची पंढरी म्हणून उल्लेख केला जायचा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला पश्चिम महाराष्ट्राचा हा संपुर्ण प्रदेश आहे. त्यातचं, पुणे शहर आणि परिसर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ही महत्वपुर्ण भाग आहे. बहुजनांच्या शिक्षणाचा पाया आणि केंद्र म्हणून ओळख असलेली रयत शिक्षण संस्था याच मतदारसंघात येते. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विचारांच्या किंवा नेत्यांच्या अनेक नामवंत शिक्षण संस्था याच मतदारसंघात आहेत. कोल्हापूर गादीचे छत्रपती शाहू महाराजांच्या बहुजन विचारांचा प्रभाव ही येथील मतदारांवर आहे. त्यामूळे पदवीधर मतदारसंघात पुरोगामी आणि प्रतिगामी अशा दोन्ही विचारांचा परंपरागत मतदार मोठ्या प्रमाणावर विभागलेला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात जवळपास ६ लाख मतदार आहेत. त्यापैकी एकट्या पुण्यात पावणे दोनलाख मतदार आहेत.
तेव्हा, अशा या अनेक अंगानी महत्वपुर्ण असणा-या पुणे पदवीधर मतदारसंघातून आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडूण यावा म्हणून प्रत्येक पक्ष चुरशीने प्रयत्न करित असतो. विधानपरिषदेवर प्रतिनिधींना अर्थात आमदारांना ६ वर्ष काम करण्याचा कालावधी मिळत असतो. १९ जुलै रोजी या मतदारसंघाच्या जागेची मुदत संपली आहे. मागील दोन्ही निवडणूकांचे मतदान २० जुन रोजी झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव नसता तर या जुनमध्ये पुणे पदवीधर मतदासंघाची निवडणूक जाहिर होऊन निवडणूकीची सर्व प्रक्रिया पुर्ण झाली असती.मात्र, कोरोनामूळे ही निवडणूक कधी होईल हे अनिश्चित आहे. सध्या, हा मतदारसंघ भाजप आणि राष्ट्रवादीकडे आहे. त्यात शिवसेनेची काय भूमिका असणार आहे, हेही महत्वाचे आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यास निवडणूक एकतर्फी होऊ शकते किंवा राष्ट्रवादीचे पारडे जड होऊ शकते.
आज प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी प्रचंड चुरस आहे. त्यातल्या त्यात सत्ताधारी पक्ष म्हणून आणि होमपीच म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड मोठी आहे. सध्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून निवडणूक लढविण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र व पाठिमागच्या निवडणूकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार सारंग पाटील (कराड, सातारा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस व युवकचे माजी अध्यक्ष उमेश पाटील (नरेखड ता. मोहोळ, सोलापूर), शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे (वाकाव, ता माढा,सोलापूर), मोहोळच्या राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील अनगर, मोहोळ, सोलापूर) व गेल्या वेळस अपक्ष निवडणूक लढविलेले आणि तिस-या क्रमाकाचे मताधिक्य घेतलेले अरुण लाड ( कुंडल,सांगली) आदी उमेदवार प्रबळ दावेदार आहेत.
सन २०१४ मधील निवडणुकीत सारंग पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना चांगली टक्कर दिली होती. त्यावेळी पहिल्या पसंतीचा कोटा ७६,२०१ इतका निश्चित केला होता. मात्र, पहिल्या पसंतीची मते कुठल्याच उमेदवाराला मिळाली नाहीत. त्या अटीतटीच्या लढतीमध्ये चंद्रकांत पाटील हे जेमतेम २ हजार मतांनी निवडूण आले होते.
परंतू, २०१४ च्या आधी सहा वर्ष तयारी केलेले राष्ट्रवादीचे प्रबळ इच्छूक उमेदवार अरुण लाड यांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी लाड यांनी ३७ हजार मते घेतली होती. राष्ट्रवादीत बंडखोरी झाली नसती तर सारंग पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असते. मात्र, यावेळी त्यांचे वडील श्रीनिवास पाटील हे सातारा मतदारसंघातून विजयी झाले असल्यामूळे एकाच घरात दोन पदं देताना सारंग पाटील यांचे नाव मागे पडू शकते. कदाचित, २०२४ ला ते सातारा मधून खासदारकीचे उमेदवार असू शकतात. सारंग पाटील यांनी पराभूत झाल्यानंतर सतत मतदारसंघात संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सारंग पाटील यांना तिकिट मिळाल्यास त्यांच्या जमेच्या अनेक बाबी त्यांच्या पथ्यावर पडू शकतात. शिवाय आधीच्या नेटवर्कचा त्यांना फायदा होऊ शकतो. मात्र, त्यांना तिकिट मिळाल्यास अंतर्गत धुसफूस होऊ शकते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे प्रवक्ता, पक्षाचे सरचिटणीस व सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील हेही प्रमूख दावेदार आहेत. यूवक संघटना व पक्षाच्या माध्यमातून त्यांचा या पाच ही जिल्ह्यात चांगला संपर्क आणि नेटवर्क आहे. तसेच त्यांचे ही पुण्यात वास्त्यव्य आहे, शिवाय, त्यांचे सासरे शरद पवार यांचे खास विजयराव कोलते हे सासवड, पुणे येथील असल्याने पुणे जिल्ह्यातील नातेगोते ही त्यांना फायदेशीर ठरु शकते. तसेच त्यांच्या पत्नी तृप्ती कोलते पाटील या पुणे शहर तहसीलदार म्हणून कार्यररत असून त्यांनी पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी सेवा केली आहे. शिवाय, उमेश पाटील यांनी स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून गोळा केलेला मित्रपरिवार ही मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच ते अॅग्रीकॅास असल्याने त्यांचा तोही मित्रपरिवार बराचसा आहे. विशेष म्हणजे, उमेश पाटील हे महाराष्ट्र राज्य पदवधीर संघटनेचे अध्यक्ष असल्याकारणाने त्यांच्या मागे पदवीधरांची मोठी फळी आहे. अतिशय चाणाक्ष, अभ्यासू आणि स्मार्ट नेता म्हणून उमेश पाटील यांची ओळख आहे. तसेच, अजित पवार यांचे खास म्हणून पक्षात त्यांचे स्थान आहे.
शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे जरी मूळचे माढा, सोलापूरचे असले तरी गेल्या १५ ते २० वर्षापासून त्यांचे वास्त्यव्य पुण्यात आहे. तसेच व्याख्यानांच्या निमित्ताने व पुरोगामी चळवळींच्या निमित्ताने त्यांचा या पाच ही जिल्ह्यात चांगला वावर आणि परिचय आहे. शिवाय, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या तिकिटापासून ते त्यांच्या विजयापर्यंत पडद्यामागे महत्वपुर्ण भूमिका पार पाडणारे संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड कोकाटे यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत.तिकिट मिळाल्यास गायकवाड यांची कोकाटे यांना लाखमोलाची साथ मिळू शकते.
मोहोळचे माजी आमदार व शरद पवार यांचे एकनिष्ठ राजन पाटील यांचे सुपुत्र सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांना ही तिकिटासाठी पक्षातून बळ मिळू शकते. राजन पाटील यांची पक्षात असलेली एकनिष्ठ प्रतिमा, युवा नेता म्हणून बाळराजे यांची असलेली ओळख फायदेशीर ठरु शकते. राजन पाटील यांच्या स्वभावामूळे सोलापूर जिल्हातून सर्वपक्षीय मते बाळराजे यांना मिळू शकतात. शिवाय, राजन पाटील हे अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत, त्यामूळे पूणे जिल्ह्यातून एकगट्टा मते बाळराजे पाटील यांना देण्यासाठी अजित पवार नक्कीच प्रयत्न करु शकतात.
राष्ट्रवादीची उमेदवारी गृहित धरुन ज्यांनी गेल्यावेळेस मोर्चेबांधणी केली होती. ते अरुण लाड गेल्या सहा वर्षात मागच्या वर्षीच्या तूलनेनं तसे शांतच राहिले आहेत. गेल्या वेळच्या निवडणूकीच्या आधी साता-यात अजित पवार यांनी त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. मात्र, शरद पवार यांनी त्यांचे खास मित्र श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना मधूनच उमेदवारी दिल्यामूळे लाड यांना बंडखोरी करत अपक्ष उभे रहावे लागले होते. मात्र, त्यावेळेस त्यांनी लक्षणीय मते घेतली होती. अरुण लाड यांचे रेडीमेड नेटवर्क, लाड कुटूंबियाचा ऐतिहासिक वारसा, कारखानदारीची ताकद आदी गोष्टींची त्यांना साथ देऊ शकते. तसेच सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य व गटनेते त्यांचे चिरंजीव शरद लाड यांचे संघटन व निवडणूकीची रणनिती अरुण लाड यांना विजयी करण्यासाठी कामी येऊ शकते.
सन २०१४ सालच्या निवडणूकीत चंद्रकांत पाटील यांना ६१,४५३, तर सारंग पाटील यांना ५९,०७३ मते मिळाली होती. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार अरुण लाड यांनी व्यक्तिगत पातळीवर लढा देत ३७,१८९ मते मिळवली होती. निसटता विजय मिळालेल्या चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या सत्तेत शरद पवार आणि राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात फार त्रास दिला आहे. तर पाटील यांनी गेल्यावेळेस थोडक्यात राष्ट्रवादीच्या विजयाचा घास हिरावला होता. भाजप आणि राष्ट्रवादीचे पाचही जिल्ह्यांत चांगले नेटवर्क आहे. पुढील राजकीय गणिते लक्षात घेऊन राष्ट्रवादी ही निवडणूक वरिल पैकी एका उमेदवाराला घेऊन ताकदीने लढविणार अशी माहिती सूत्रांनी दिली.
सन २०१४ मधील उमेदवारांना मिळालेले मताधिक्य व निवडणुकीचा निकाल
पालकमंत्री चंद्रकांत पाटील ६१,४५३
सारंग पाटील ५९,०७३
अरुण लाड ३७,११९
शैला गोडसे १०,५९४
शरद पाटील ८,५११
Team: DDNewsMarathi
बातमी नक्की शेअर करा