मुंबई, दि.२६ :
कै.कांशीराम यांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजकारण व राजकारणाची सुरुवात करणारे आणि एकेकाळचे धनगर समाजातील फायर ब्रँन्ड नेते तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे सध्या भाजपवर नाराज असल्याचे समजते आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, एकेकाळी रासपचा सांगली जिल्हाध्यक्ष असणारा कार्यकर्ता गोपीचंद पडळकर यांना भाजपने आमदार करणे आणि त्यांना धनगर समाजाचा चेहरा म्हणून स्पेस देऊन जानकर यांचा राजकारणातून पत्ता कट करण्याचा यामागील भाजपाचा डाव आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांना वाटत आहे.
वरिल प्रमुख कारणांसह पुढील ही काही कारणे जानकरांच्या नाराजी मागे आहेत असे समजते. मे २०१९ रोजी झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपसोबत युती असून काही जागांची मागणी असून सुध्दा रासपला एक ही जागा न देणे, जानकरांना राष्ट्रीय राजकारणात आवड असताना महाराष्ट्राच्या राजकारणात अडकवून ठेवणे, तसेच सन २०१४ साली दौंड मधून रासपचे आमदार असलेल्या राहुल कुल यांच्या पत्नीला बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवायला लावणे, त्यावेळी जानकर यांना जास्त विश्वासात न घेतल्याची खंत, लोकसभा निवडणूकीत विधानसभेला जास्त जागा देण्याचे अश्वासन फडणवीस व भाजप वरिष्ठांकडून मिळाले. मात्र, विधानसभेला ५२ जागांची रासपची मागणी असताना कमी दर्जाच्या काही जागा देऊन बोळवण करणे, गोपीनाथ मुंडेच्या शब्दावर भाजप प्रवेश केलेले आणि पंकजाताई यांचा भाऊ म्हणून राजकारण करणा-या जानकर यांच्या मानलेल्या बहिण पकंजा मुंडे यांचा फडणवीस आणि टिमने पडद्यामागून पराभव करणे आणि भाजपाची सत्ता गेल्याने मंत्रीपदापासून दूर जावं लागणे या प्रमुख कारणांनी महादेव जानकर व समर्थक नाराज असल्याचे समजते.
भाजप आणि महादवे जानकर यांच्या वादाची सुरुवात मुळात, सन २०१४ सालापासून सुरु झाली होती. सन २०१४ साली भाजपची सत्ता आल्यावर कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याशिवाय मंत्रालयाची पायरी चढणार नाही अशी हटवादी शपथ महादेव जानकर यांनी घेतली होती. त्यावेळची ही कृती कुठेतरी भाजपला खटकल्याची तेव्हा दबत्या आवाजात भाजपमध्ये चर्चा होती. पुढील काळात, महादेव जानकर यांनी भाजपमध्ये पक्ष विलिन करावा किंवा थेट भाजप प्रवेश करावा यासाठी ही भाजपने खूप प्रयत्न केले. मात्र, महत्वकांंक्षी व हट्टी असलेले जानकर यास तयार झाले नाहीत. त्यानंतर ख-या अर्थाने भाजपाने स्वतःच्या पक्षात धनगर समाजाला एका आवाजात ओळविणारा धनगर समाजाचा नेता घडविण्याची मोहिम सुरु केली.
त्यानंतर भाजपाने धनगर समाजाचे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्व ओळखून आणि महादेव जानकर यांना शह देण्यासाठी सन २०१४ नंतर नागपुरच्या डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेवर खासदार व प्रा.राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्री केले. भाजपने धनगर व्होट बँकेसाठी स्वतःच्या पक्षातील धनगर समाजाचा नेता तयार करायचा चंग बांधला होता. मात्र, गेल्या पाच वर्षात खासदार डॉ.विकास महात्मे व राम शिंदे यांना प्रचंड स्पेस देऊन ही ते शक्य झाले नाही. या दरम्यान महादेव जानकर यांची ब-यापैकी धनगर समाजात क्रेझ होती. त्याला कुठेतरी भाजपला छेद द्यायचा होता.
निवडणूकांच्या पार्श्वभमीवर महत्वकांक्षी असलेल्या आटपाडीच्या (सांगली) गोपीचंद पडळकर आणि वेळापुरच्या ( सोलापुर) उत्तम जानकर यांनी धनगर आरक्षणासाठी राज्यभर स्पॅान्सर दौरे सुरु केले होते. त्याच दरम्यान, या दोघांनी स्वतःच्या क्रेझसाठी एका चित्रपटाची निर्मिती केली. धनगर समाजाची श्रध्दास्थान असणारी मंदिरे व देवस्थाने या ठिकाणी मोठंमोठाल्या सभा घेऊन वातावरण निर्मिती केली. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांची मोट बांधत अनोखी वंचित बहुजन आघाडी निर्माण केली होती. त्यावेळी, गोपीचंद पडळकर यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून वंचितने तिकिट दिले आणि पडळकरांनी क्रमांक दोनचे जवळपास तीनलाखाच्या आसपास मतदान घेतले.
धनगर आरक्षण दौरे, सभांची गर्दी, लोकसभेला मिळालेली लक्षणीय मते आणि धनगर समाजातील पडळकर यांचे वाढते महत्व लक्षात घेऊन धुर्त चंद्रकांत पाटील आणि चाणाक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांचा विधानसभे्च्या तोंडावर भाजप प्रवेश करुन घेतला आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात संख्येने धनगर समाज जास्त असलेल्या बारामतीतून पडळकर यांना तिकिट दिले. येथे पडळकर यांची क्रेझ पवारांच्या करिष्यासमोर टिकू शकली नाही.
मात्र, पडळकरांच्या भाषणातील शिवराळ भाषा, उपद्रव्यमुल्य, भाजपला स्वतःच्या पक्षातील धनगर समाजाचा हवा असलेला नेता तयार करण्याचे स्वप्न, महादेव जानकर आणि मराठा समाजाला शह देण्यासाठी पहिल्याच कोट्यातून पडळकरांना विधानपरिषेदत आमदारकी दिली. नुकतेच, शरद पवारांच्या विरोधात चुकीचे वक्तव्य करुन पडळकर यांनी भाजपाला अपेक्षित असलेले स्वतःचे उपद्रव्यमुल्य दाखवून दिले आहे. तेव्हा, आजतरी भाजपला स्वःपक्षातील हवा असलेला धनगर समाजाचा नेता मिळाला असून धनगर समाजाचा नेता शोध मोहिम भाजपाची सध्या संपली आहे.
एकेकाळी धनगर समाज म्हणजे महादेव जानकर आणि महादेव जानकर म्हणजे धनगर समाज अशी जानकर यांची समाजाबरोबर नाळ जुळलेली असताना आज मात्र, पडळकरांचीच धनगर समाजात चर्चा आहे. आजच्या परिस्थितीत महादेव जानकर समाजात ही आणि राजकारणात ही दूर दूरपर्यंत दिसत नाहीत. गोपीचंद पडळकर यांना यापुढील काळात धनगर समाजाचा नेता म्हणून भाजप स्पेस देईल. पर्यायाने त्यामुळे महादेव जानकरांचे अस्तित्व आणि धनगर समाजावरील जानकरांची पकड कमी होत जाईल हे चळवळीतून आलेल्या चाणाक्ष जानकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ओळखले आहे. तेव्हा, भाजपने खेळलेल्या धनगर समाज व्होट बँकेच्या राजकारणामुळे महादेव जानकर व रासपचे अस्तित्व पुढील काळात नष्ट होऊ शकते. त्यामूळे, महादेव जानकर व समर्थक लवकरच, ठोस राजकीय पाऊले उचलणार असल्याचे कळते. येत्या काही दिवसात रासप पक्षात नवी बांधणी आणि नवी दिशा ठरविण्याचे खलबते सुरु होणार आहेत. मात्र, महादेव जानकर यांच्या नाराजीची भविष्यकाळात भाजपाला फार मोठी किंमत चुकवावी लागू शकते. कारण, जानकर हे चळवळीतून आलेले नेते आहेत त्यामूळे भाजपसाठी पडळकर यांच्यापेक्षा महादेव जानकर यांचे उपद्रवीमुल्य जास्त आहे. हे तितकेच खरं आहे.
भाजपच्या वळचणीला गेलेले तूम्ही सर्वजण (जानकर,खोत,आठवले, मेटे) एक दिवशी स्वःचे अस्तित्व संपवून बसाल असं कुमार सप्तर्षी यांनी जानकर यांना मंत्री झाल्यावर खाजगीत सांगितले होते.आज सप्तर्षी यांचे ते बोल सत्यच होत आहेत की काय अशी आठवण त्यांच्या एका कार्यकर्त्यांने सांगितली.
Team DD News Marathi
बातमी नक्की शेअर करा