पुणे प्रतिनिधी :
दि. २३ मार्च २०२४
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित झाला असून, येत्या 26 मार्च रोजी ते राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधतील. खुद्द आढळराव पाटील यांनीच याबाबत माहिती दिली आहे. तब्बल वीस वर्षांनंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांचं स्वगृही परतणं होणार आहे. शिरूरमधून ते राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी असेल.
शिवाजीराव आढळराव पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते होते. आंबेगाव तालुक्यात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांची अतूट मैत्री होती हे सर्वश्रुत आहे. त्या दरम्यान आढळराव पाटील हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. त्यांना २००४ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खेड मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी हवी होती. मात्र, त्यावेळचे खासदार अशोकराव मोहोळ यांनाच पक्षाने तिकीट दिले होते. त्यामुळे आढळराव पाटील यांनी २००४ मध्ये राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर आढळराव पाटील राष्ट्रवादीत परत येत आहेत.
राष्ट्रवादी प्रवेशाबाबत आढळराव म्हणाले,” प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे माझा राष्ट्रवादीत येत्या 26 तारखेला सायंकाळी प्रवेश होणार हे निश्चित आहे. प्रवेशासंदर्भात माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं आहे. तसंच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणं झालं आहे. या दोघांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे, त्यामुळे माझ्या पक्षप्रवेशाला महायुतीच्या नेत्यांकडून हिरवा कंदील मिळाला आहे.”
आढळराव पुढे म्हणाले, “माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे, त्यामुळे उमेदवारी निश्चित होणार का, असा प्रश्नच येत नाही. कारण घड्याळ्याच्या चिन्हावर मीच शिरूरमधून निवडणूक लढविणार हे नक्की आहे. मागील लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी मी उभा राहणार आहे. शिरूरमधून माझा विजय होईल, याची मला शंभर टक्के खात्री आहे.”
ते पुढं म्हणाले, “माझं जे गणित आहे, त्यानुसार पहिली निवडणूक मी तीस हजार मतांनी तर दुसरी निवडणूक एक लाख 80 हजार मतांनी जिंकलो. तिसरी तर तीन लाखांनी जिंकलो होतो. आगामी निवडणूक ही सर्व रेकॉर्डस तोडणारी असेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.” पंतप्रधान मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आपण प्रयत्न करणार आणि सर्व उमेदवार जिंकतील, असा विश्वासही आढळराव पाटील यांनी बोलून दाखवला.
राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार पळवला, असं काही नाही. मी महायुतीमधलाच उमेदवार आहे, असेही आढळराव यांनी नमूद केले. दरम्यान, शिरूरमधून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी घोषित झाली आहे, त्यामुळे शिरूरमध्ये पुन्हा आढळराव विरोधात कोल्हे असाच सामना रंगणार आहे.