पुणे प्रतिनिधी :
दि. २५ मार्च २०२४
देवेंद्र फडणवीस यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील वादावर पडदा टाकण्याच्या हेतूने हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. त्यानंतर फडणवीसांनी अजित पवारांशी फोनवरून चर्चा केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या मोठे नाट्य रंगले आहे. महायुतीतील नेतेच एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आहे. एकीकडे पवार कुटुंबीयांना आव्हान देत माजी आमदार विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय, तर दुसरीकडे इंदापूरमधून विधानसभेचा शब्द मिळाल्याशिवाय लोकसभेचे काम करणार नाही, असा पवित्रा माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी घेतलाय.
त्यामुळे बारामतीतील हा वाद मिटवण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावरती खलबतं सुरू होती.
या बैठकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आठवड्यात इंदापूर येथे मेळावा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मेळाव्यामध्ये हर्षवर्धन पाटील, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रित कार्यकर्त्यांशी संवाद साधून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करतील असे समजते. तसंच हर्षवर्धन पाटील यांच्यावर बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या काळात हर्षवर्धन पाटील बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा प्रचार करताना दिसणार आहेत. ही चर्चा एकुणात सकारात्मक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय पण त्यांना समजदेखील दिल्याचं बोललं जात आहे. विधानसभेबाबतच्या शब्दासाठी आग्रही असलेल्या हर्षवर्धन पाटलांना “विधानसभेसंदर्भात वेळ आल्यावर निर्णय घेऊ. आता प्रथम लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा,” असे आदेश दिले आहेत.
बारामती मतदारसंघामधून महायुतीच्या उमेदवारासाठी काम करा, त्याच्या विरोधात कोणताही प्रचार करू नका आणि तशी समज समर्थकांनाही द्या; असे आदेश फडणवीसांनी पाटलांना दिल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून देण्यात येणाऱ्या धमक्यांबाबत योग्य ती कारवाई करू, असे आश्वासनदेखील देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचं बोललं जातंय.