मुंबई प्रतिनिधी :
दि. २८ मार्च २०२४
शिवनेरी किल्ल्यावर तिथीनुसार आज गुरुवारी (ता. २८) शिवजयंती साजरी होत आहे. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे (ठाकरे गट)
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहाणार होते. हेलिकॉप्टरसाठी परवानगीकरिता सुमारे दहा दिवसांपूर्वी त्यांनी अर्ज केला होता. मात्र,
सोहळ्याच्या पूर्व रात्री म्हणजे काल बुधवारी (ता. २७) रात्री उशिरा त्यांना ही परवानगी देण्यात मिळाली. या परवानगीबाबत त्यांना कुठल्याही
प्रकारची माहिती मिळाली नसल्याचे समजते. परिणामी दौऱ्याच्या तयारीअभावी ठाकरे शिवनेरीवर जाऊ शकू नयेत, अशीच व्यवस्था मुद्दाम
केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होऊ लागला आहे.
उद्धव ठाकरे तिथीनुसारच्या शिवजयंतीला शिवनेरीवर येणार होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे खासदार
अमोल कोल्हे यांनी परवानगी मागितली होती. या परवानगीचा अर्ज त्यांनी 19 मार्च रोजी संबंधित प्रशासनाकडे दिला होता. त्यानुसार दिल्लीतून
परवानगी मिळाली खरी, पण बुधवारी रात्री उशिरा…दरम्यान, परवानगीबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने शिवसेना आणि महाविकास
आघाडीकडून या दौऱ्याबाबत तयारी केली गेली नव्हती. पुरातत्त्व विभागाकडून उशिरा परवानगी देऊन केंद्र सरकारने ठाकरे यांची एक प्रकारे
कोंडीच केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभेची धामधूम सध्या देशात सुरू आहे. महाराष्ट्रातही महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटपाचे काम अंतिम टप्प्यात आले
असून जागा वाटपातही दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. छोट्या पक्षांना आपल्याकडे सहभागी करून घेण्यासाठी
डावपेच आखले जात आहेत. असे असले तरी काही जागांवरील पेच सोडवताना मित्रपक्षांची नाराजी टाळण्यासाठी दोन्ही बाजूंना कसरत सुरू
आहे. याचाच परिपाक म्हणजे भाजप सरकारने शिवजयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंची केलेली ही कोंडी आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या शक्यतेने सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवनेरीवर हेलिपॅड सज्ज करून ठेवले होते मात्र, परवानगी
उशिरा मिऴाल्याने दौरा अधांतरी राहिला.
दरम्यान, या रात्री अगदी उशिरा दिलेल्या परवानगीबाबत ठाकरे गटातील कुणालाही माहिती देण्यात आली नसल्याने ठाकरेंची कोण कोंडी
करू पाहत आहे, या कुरघोडीमागे नक्की कोण आहे, असे प्रश्न ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून केले जात आहेत.