पुणे प्रतिनिधी :
दि. २९ मार्च २०२४
महाय़ुतीतील तिन्ही पक्षांनी दावा ठोकल्याने पेच निर्माण झालेल्या मावळची जागा अखेर शिवसेनेच्याच पदरात पडली. तेथे पुन्हा श्रीरंग बारणे हेच उमेदवार असतील असे स्पष्ट झाले आहे. आता या मतदारसंघातून बारणे खासदारकीची हॅटट्रिक करतात का हे पाहावे लागणार आहे.
दोन दिवसांपूर्वीच अजित पवारांनी मावळात आपल्याला धनुष्यबाण चालवायचे आहे, असे पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात मंचर येथे सांगितले होते. त्यानंतर या जागेसाठी आग्रही असलेले त्यांचे कट्टर समर्थक मावळचे आमदार सुनील शेळकेंची भूमिकाही मवाळ झाली.
अजितदादा म्हणतील तसं आम्ही करू. त्यांच्य़ा आदेशाबरोबरच युतीधर्माचेही पालन करू, जो कोणी उमेदवार होईल, त्याचे धडाडीने काम करूअसे ते बारणेंची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी म्हणाले होते. त्यानंतर शिवसेनेने आपली आठ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली. रामटेक मतदारसंघाशिवाय बाकीच्या सर्व जागांवर बारणेंसारखेच तिथल्या खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
२०१४ आणि २०१९ साली सलग दोनदा बारणे हे मावळमधून निवडून आलेले आहेत. २००९ ला हा मतदारसंघ निर्माण झाला तेव्हा तेथील पहिले खासदार हे शिवसेनेचेच गजानन बाबर होते. तर, मावळ विधानसभा मतदारसंघातही अद्याप कुणाचीही आमदारकीची हॅटट्रिक झालेली नाही. त्यात बारणेंची खासदारकीची हॅटट्रिक झाली तर तो या मतदारसंघातील विक्रम असणार आहे.
पक्षाची आठ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी जाहीर केली. त्यात मावळमध्ये बारणेंसह राहूल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई), संजय मंडलिक (कोल्हापूर), हेमंत पाटील (हिंगोली), प्रताप जाधव (बुलढाणा), सदाशिव लोखंडे (शिर्डी) आणि धैर्यशील माने (हातकणंगले) या विद्यमान खासदारांना त्यांच्याच जागेवर पुन्हा रिपीट करण्यात आले आहे.
रामटेकच्या राखीव जागी कॉंग्रेसमधून आलेल्या राजू पारवेंना संधी देण्यात आली आहे. तेथील खासदार कृपाल तुमाने यांच्याऐवजीही निवड झाली आहे. भाजपच्या पाहणीनुसार त्यांचा रिपोर्ट नकारात्मक आल्याने त्यांना तेथे उमेदवारी न देण्याचे भाजपचे म्हणणे होते. दरम्यान, शिर्डी शिवसेनेला मिळाल्याने आरपीआयच्या आशेला सुरुंग लागला आहे आणि त्यांना लोकसभेची एकही जागा मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.