शिरूर प्रतिनिधी :
दि. ३० मार्च २०२४
पुणे जिल्हा व त्यातही शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो . राष्ट्रवादीचे सहापैकी चार आमदार तेथे आहेत. तरीही तेथे लोकसभेसाठी त्यांना शिवसेनेतून उमेदवाराची आय़ात करावी लागली, याचेच कुतूहल सर्वांना आहे.
फूट पडण्याआधी एकसंध राष्ट्रवादीचा पुणे जिल्हासुद्धा बालेकिल्ला होता. कारण त्याचे संस्थापक अध्यक्ष या जिल्ह्यातील आहेत. पक्ष फुटला, तरी जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. एकसंध पक्षाचे तेथे चारपैकी दोन खासदार आहेत, तर शिरूरला सहापैकी पाच आमदार आहेत. यसह खेचआघाडीनेही या वेळी काही आमदारांचे प्रमोशन केले आणि त्यांना खासदारकीची संधी दिली. मात्र, शिरूर त्याला अपवाद राहिले. तेथे युतीमधल्या राष्ट्रवादी
पक्षाने आपल्या चारही आमदारांना लायक असूनही लोकसभेला संधी दिली नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एवढेच नव्हे, तर विलास लांडेंसारख्या भोसरीच्या माजी आमदारांनाही ते इछुक असूनही डावलले गेले. त्यांनी का डावलले याचे कुतूहल आहे.
पक्षात दमदार दावेदार असताना देखील राष्ट्रवादीने शिरूरसाठी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना आयात केले, त्यामागे फक्त अजित पवारांनी कोल्हेंना पराभूत करण्याचे जे चॅलेंज दिले आहे तेच असल्याचे दिसून आले आहे. कारण कोल्हेंचा पराभव हा शरद पवारांचाही नैतिकदृष्ट्या पराभव असणार आहे. कारण कोल्हे हे शरद पवारांचा शोध आहेत. तसेच कोल्हे यांनी साथ सडणे यामुळेही अजितदादांचा त्यांच्यावर डूख आहे. म्हणून त्यांचा पराभव करणे, हेच मुख्य कारण उमेदवार दुसरीकडून मागवण्यामागे आहे. तीन वेळा शिरूरचे खासदार राहिलेल्या अढळरावांचा जनसंपर्कही दांडगा आहे. यामुळे तेच कोल्हेंचा पराभव करायला तेच समर्थ आहेत याची खात्री पटल्याने अजितदादांनी आपले आमदार आणि मंत्र्यांनाही (दिलीप वळसे-पाटील) डावलून आढळरावांना तिकीट दिले आहे.
सामान्यतः आमदार हे खासदारकीसाठी एका पायावर तयार असतात. पण शिरूरमध्ये तसे दिसून येत नाही. कारण तेथील आमदारकीची व पर्यायाने त्यातून मिळणाऱ्या मंत्रिपदाची सुभेदारी, वतनदारी अनेकांना सोडायची नाही. म्हणून आजारपणाचे कारण दिलीप वळसेंनी खासदारकी नाकारताना दिले. त्यात सध्या राज्यात ते कॅबिनेट मंत्री आहेत. शिवाय पुन्हा होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे निवडून येण्याची शक्यता असूनही त्यांनी ती संधी यावेळीच नाही, तर गेल्यावेळीही सोडलेली आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील हेसुद्धा दिल्लीत जाण्यासाठी एकदम योग्य आहेत पण, त्यांनाही राज्यात मंत्री बनण्याची इच्छा असल्याने त्यांनीही खासदारकीकडे पाठ फिरविली आहे.
दुसरीकडे पक्ष फुटल्यानंतर काहीकाळ तटस्थ राहिल्याने जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि हडपसरचे चेतन तुपे यांना याबाबत पक्षाने विचारण्याची शक्यताच नव्हती. तर भोसरीचे आमदार महेश लांडगे तयारीत होते तरी ते भाजपचे असल्याने राष्ट्रवादीकडून त्यांच्या लढण्याची काडीमात्र शक्यता नव्हती व नाही. लांडे हे मागे खासदारकीला हरले होते त्यामुळे त्यांचा विचार या वेळी पुन्हा केला गेला नसावा. शिवाय ते कोल्हेंविरुद्ध निवडून येतील की नाही, याविषयी अजितदादा साशंक असल्याने त्यांनी मोठा दावा करूनही त्यांना दिल्लीची संधी दिली गेली नाही.