हिंगोली प्रतिनिधी :
दि. ३१ मार्च २०२४
एका कुटुंबाने मतदानाच्या दिवशी मतदानाला दांडी मारून देवदर्शनाला जाण्याचा बेत आखला होता. मात्र, आई-वडिलांचे हे संभाषण त्यांच्या चिमुकल्याने ऐकले आणि थेट पोलिसांनाच पत्र लिहिले.
मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे आणि अपेक्षितही तेच आहे. पण त्यानंतरही अनेक जण मतदानाच्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या सुटीचा आनंद वेगवेगळे प्लॅन आखून घेत असतात. असाच प्लॅन आखत असलेल्या एका दाम्पत्याला त्यांच्याच मुलाने पोलिसांकडे तक्रार करून चांगलाच धडा शिकविला आहे. सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगली आहे.
हा प्रकार हिंगोलीत घडला आहे. येथील एका चिमुरड्याने चक्क पोलिसकाकांना पत्र लिहून “मतदानाला दांडी मारण्याचा विचार करणाऱ्या आई वडिलांना ताब्यात घ्या,” अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी गावाला जाण्याऱ्या आई-बाबांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
मतदानाच्या दिवशी दांडी मारून देवदर्शनाला जाण्याचा बेत हिंगोलीतील एका कुटुंबाने आखला होता. मात्र, आई-वडिलांचे सदर संभाषण ऐकून एका चिमुकल्याने थेट पोलिसांनाच पत्र लिहिले. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही घटना हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावामध्ये घडली आहे. या गावातील चिमुकल्याने गोरेगाव पोलिसांना रोखठोक पत्र लिहून लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानाला दांडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आई-वडिलांनाच धडा शिकवला.
हा चिमुकला हे पत्र घेऊन जेव्हा गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला, तेव्हा त्याने लिहिलेले पत्र पाहून गोरेगाव पोलिसही अक्षरशः भारावून गेले. गोरेगावचे सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी चिमुकल्याची समजूत काढली आणि त्याच्या आई-वडिलांनादेखील समज दिली आहे.