पुणे प्रतिनिधी :
दि. ०२ एप्रिल २०२४
पुणे लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. महायुतीने माजी महापौर
मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्याचा निर्णय घेतलाय, तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊ केली
आहे. या दोन्ही उमेदवारांनी आपापल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. शहरातील विविध भागात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी ते घेत आहेत. दोन्ही उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू
आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. आजच्या काळात बहुतेक नागरिक हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याने याचा
अधिकाधिक वापर राजकीय पक्ष करत आहेत.
या सोशल मीडियाचाच वापर करून आता भाजपने पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ट्रोल करायला सुरूवात केली आहे. विद्येचे
माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, आयटी हब अशी ओळख पुणे शहराची असल्याने या शहराचा खासदार हा सुद्धा उच्चशिक्षित असला पाहिजे असा सूर त्यांनी लावला आहे. दिल्लीत
गेल्यानंतर त्याने आपल्या शहराचे प्रतिनिधित्व यशस्वीपणे करत शहराच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र, हा उमेदवार कमी शिकलेला असेल
तर तो दिल्लीत काय तग धरणार, असा खोचक प्रश्न भाजपकडून विचारला जात आहे.
भाजपने महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘मविआचा अशिक्षित
उमेदवार’,‘रवींद्र धंगेकर फक्त 8वी पास !’, ‘पुणे शिक्षणाचे माहेरघर, पण त्याचा उमेदवारच अशिक्षित’ असं लिहून धंगेकर यांचा फोटो असलेला मेसेज सोशल मीडियावरून सध्या
जोरदार व्हायरल केला जात आहे.
शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करत आमदार धंगेकर यांना जोरदारपणे ट्रोल केले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे मेसेज वेगवेगळ्या समाज माध्यमांवर फिरविले जात आहेत. यामध्ये
भाजपचे पदाधिकारी असल्याचा आरोप होत आहे.
सोशल मीडियावर होत असलेल्या या ट्रोलिंगला महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर यांनीदेखील प्रत्युत्तर दिले आहे. ते माझ्या शिक्षणावर बोलतायत म्हणजे त्यांना पराभव स्पष्ट
दिसतोय, असे म्हणत, जनतेमध्ये आपली पीएचडी झाली असून जनतेनेच आपल्याला पीएचडीचं सर्टिफिकेट दिले आहे आणि लवकरच हे विरोधकांच्या लक्षात येईल त्यांनी प्रत्युत्तर
दिले आहे.
खरेतर भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. देशात मोदी यांची हवा आहे, असा दावा भाजपकडून सतत केला जातो. मग काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण राष्ट्रवादीचे
नेते अजित पवार यांच्यासह इतर पक्षातील नेत्यांना भाजपने का जवळ केले? असा प्रश्न धंगेकर यांनी विचारला आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत अशा प्रकारचे मेसेज
सोशल मीडियावरून प्रसारित करून एकमेकांना ट्रोल करण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे यामुळे दिसत आहे.