बारामती प्रतिनिधी :
दि. ०३ एप्रिल २०२४
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगतो आहे हे सर्वांना माहीत आहे. सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यावर, माझ्या आई समान
असलेल्या वहिनीला भाजपने माझ्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवले अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनीदिली होती. यावरून आता महायुतीतील विविध पक्षातील नेते टीका करू
लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची याबाबतची प्रतिक्रिया बोलकी आहे.
पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ विविध मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान शहराध्यक्ष दीपक
मानकर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना दिसले.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धंगेकर यांच्या ८वी पासची पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट महायुतीतील नेत्यांकडून व्हयरल करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून
करण्यात येतोय. या मुद्द्यावरती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी नेमकी प्रतिक्रिया दिली आहे. मानकर म्हणाले, या राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा हेसुद्धा चौथी पास
होते. राजकीय जीवनामध्ये एखादा नेता समाजाचं काम किती करतोय, समाजाचे हित किती जपतोय आणि प्रशासनावरती त्याचं नियंत्रण किती आहे हे महत्त्वाचं असतं. त्याचा अभ्यास
असणारा व्यक्तीदेखील चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्यामुळे शैक्षणिक मुद्दा राजकीय जीवनात गौण आहे.
मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर होते. तेव्हा त्यांनी कोविड काळामध्ये अत्यंत उत्तमरीत्या काम केलं आहे. घरातील व्यक्ती अॅडमिट असतानादेखील मोहोळ फिल्डवर उतरून
जीवाची पर्वा न करता काम करत होते, त्याची जाण ठेवून त्याची पावती सामान्य नागरिक नक्कीच मोहोळ यांना देतील आणि मोठ्या मताधिक्याने मोहोळ खासदार होतील, असा
विश्वास मानकर यांनी व्यक्त केला.
सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत केलेल्या वक्तव्यावरून बोलताना मानकर म्हणाले, सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांना जर आई वाटत असतील तर त्यांनी
आईच्या विरोधात लढू नये आणि त्यांची मुलगी म्हणून आशीर्वाद घ्यावा. आईचे मुलीवरती संस्कार असतात आणि ते संस्कार जपण्याची संधी सुप्रिया सुळे यांना मिळाली आहे. त्यामुळे
त्यांनी आईला पाठिंबा देऊन या संस्कारांचा आदर करावा असं मानकर म्हणाले.