पुणे प्रतिनिधी :
दि. ०३ एप्रिल २०२४
वंचितने वसंत मोरेंना उमेदवारी दिल्यामुळे पुणे मतदारसंघात नवा ट्विस्ट आला असून आता पुण्याची लोकसभा निवडणूक तिरंगी होणार हे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करणारे मोरे हे पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. आता त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वसंत मोरेंच्या उमेदवारीमुळे पुणे मतदारसंघात नवा ट्विस्ट आला असून आता पुण्याची निवडणूक तिरंगी होणार आहे.
काही दिवसांपूर्वी मनसेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ ठोकून वसंत मोरेंनी अनेक पक्षांच्या वरिष्ठांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. यादरम्यानत्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. तेव्हापासून मोरे यांना वंचितकडून उमेदवारी मिळू शकते अशा चर्चा सुरु होत्या. या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब होऊन ते वंचितचे उमेदवार म्हणून जाहीर झाले आहेत.
मनसे सोडल्यापासून महाविकास आघाडीच्या कोट्यातून वसंत मोरेंना पुणे लोकसभेची जागा मिळू शकते, अशा चर्चा सुरु झाल्या असल्या तरी पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्यामुळे त्यांनी विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. धंगेकरांच्या उमेदवारीमुळे मोरेंना आघाडीतून उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर मोरे यांनी उमेदवारीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांपासून शरद पवारांची भेट घेतली होती. तसेच ते वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनाही भेटले होते.
वसंत मोरे यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर सूचकपणे म्हणाले होते, “वसंत मोरे यांच्याबरोबर आमची चर्चा झाली. महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि ती कोण कोण करेल हे अधिकृतरित्या काही दिवसांतच सर्वांसमोर येईल. काही गोष्टी आताच जाहीर करू शकत नाही.” त्यानुसार आज आंबेडकरांनी मोरे यांना उमेदवारी जाहीर करुन नव्या राजकारणाची सुरुवात केली आहे अश्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.
पुण्यात मोहोळ-धंगेकर-तात्यांमध्ये तिरंगी लढत होणार
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीने भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांमध्ये थेट लढत होणार असं दिसत होतं. मात्र, आता वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे पुण्यात तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.