मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात वाहू लागले आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महायुतीचा जागावाटपाचा तिढा अवघ्या ३० मिनिटात सोडवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. जागावाटपाबरोबरच दौरे, सभा, उमेदवारीच्या चर्चा सध्या सर्वत्र झडताना दिसून येत आहेत. अशातच महाराष्ट्रात जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असताना महायुतीचा जागावाटपाचा तिढा अवघ्या ३० मिनिटात त्यांनी सोडवल्याचे समजते.
राज्यामध्ये लोकसभेचे एकूण ४८ मतदारसंघ असून २०१९ च्या निवडणुकीमध्ये यापैकी ४१ जागा युतीने जिंकल्या होत्या. यामध्ये भाजपला २३ तर शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला होता. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसला ४ आणि काँग्रेस तसेच अपक्षाला प्रत्येकी १ जागा मिळाली होती.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे. सध्या राज्यात भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे महायुती सरकार सत्तेत आहे. मात्र तिन्ही पक्ष एकत्र आल्याने लोकसभेच्या जागावाटपावरून तिढा निर्माण झाला होता. हा तिढा आता सुटल्याची माहिती समोर येते आहे.
जळगाव आणि संभाजीनगरमधील सभांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी रात्री मुंबईत आले. मुंबईत दाखल झाल्यानंतर अमित शाह थेट सह्याद्री अतिथीगृहावर गेले. तिथे अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. यावेळी, अमित शहा यांनी जागा वाटपाचा तिढा फक्त ३० मिनिटातच सोडवला असे समजते. त्याचबरोबर बैठकीत व्यवहार्य तोडगा काढण्यावर ठाम राहा, हट्टापायी अडून राहू नका, असा सल्ला अमित शाह यांनी भाजपसह महायुतीमधील इतर पक्षांना दिल्याची माहिती मिळते आहे.
त्याचबरोबर भाजप लोकसभेत ३० जागांवर निवडणूक लढविणार तर शिंदे गटाला १२ जागा आणि अजित पवार गटाला ६ जागा मिळतील, असं अमित शहा यांनी महायुतीतील नेत्यांना सांगितलं असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळते आहे. ४०० चे टार्गेट घेऊन कामाला लागा, असा नेमका सल्लाही अमित शाह यांनी दिल्याचे समजते.
400 प्लसचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात महायुतीच्या भूमिकेने कामाला लागा. जागा वाटपावर जास्त वेळ न दवडता आपले सर्वांचे मिशन मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचं आहे हे डोळ्यासमोर ठेवा. जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही. उमेदवार कुणीही असो, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही तिन्ही पक्षांनी पार पाडायची आहे. काही जागांबाबत वाद असल्यास ते एकत्र बसून सोडवा, अश्या सूचना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अमित शाह यांनी दिल्या आहेत.