पुणे प्रतिनिधी :
दि. ०५ एप्रिल २०२४
एकीकडे तापमानात वाढ होत असताना दुसरीकडे विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मात्र पुढील तीन दिवस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावरून गुजरातकडे आर्द्रतायुक्त उष्ण वारे वाहात आहेत. चक्रवाताच्या स्थितीमुळे हे घडते आहे.
ह्यामुळे महाराष्ट्रातील तापमानात वेगाने बदल होताना दिसत आहेत. हवामान विभागाने मुंबई पालघरसह कोकणाच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई शहरासह पालघरमध्ये तसेच रायगड, ठाणे या ठिकाणीही हवेतील आर्द्रता वाढणार आहे. त्याच्या परिणामस्वरूप या भागातील उकाडा वाढणार आहे. तसेच विदर्भातील यवतमाळ, अकोला, चंद्रपूर या शहरांमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुपारी, विनाकारण, काम नसताना घराबाहेर पडू नये, सतत पाणी प्यावे, त्रास होतोय असे वाटल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
हवेची एक द्रोणीय रेषा वातावरणाच्या खालच्या स्तरात म्हणजे दक्षिण तमिळनाडू ते आग्नेय मध्य प्रदेशापर्यंत तयार झाली आहे. विदर्भावरून ही द्रोणीय रेषा जाते. तसेच एक प्रती चक्रावाताची स्थिती अरबी समुद्रावर तयार झाली आहे. पुढील तीन दिवस वातावरणाच्या या स्थितीमुळे विदर्भात तापमानात वाढ होईल, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. प्रामुख्याने यवतमाळ, अकोला आणि चंद्रपुरात उष्णतेच्या लाटेचा परिणाम जास्त होण्याचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भात कमाल-किमान तापमानात वाढ होऊन रात्री उकाडा वाढण्याचाही अंदाज आहे.
चक्रावाताच्या स्थितीमुळे आर्द्रतायुक्त उष्ण वारे, अरबी समुद्रावरून गुजरातकडे वाहात आहेत. हे वारे गुजरातवरून महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे येत असल्याने पुढील चार-पाच दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टीवर तापमानात वाढ होणार आहे.