नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ०६ एप्रिल २०२४
जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर लक्षद्वीपचे काही फोटो शेअर केले होते. त्यावेळेस त्यांना ट्रोल देखील करण्यात आले. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की त्यांच्या फोटोमुळे लक्षद्वीपचे नशीब बदलले आहे. मोदींच्या या भेटीने पर्यटकांच्या मनातही लक्षद्वीप भेटीबाबत उत्सुकता निर्माण केली.
सध्या अनेक पर्यटक लक्षद्वीपला भेट देत आहेत. ‘लक्षद्वीपला भेट द्या’ असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले होते. याचा बराच मोठा आणि सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. पर्यटन अधिकारी इम्तीयाज मोहम्मद टीबी यांनीही याला दुजोरा दिला आहे.
“प्रभाव खूप मोठा आहे. या बेटाबद्दल लोकांची उत्सुकता वाढली आहे.” असे एएनआय या वृत्तसंस्थेने, त्यांना पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या परिणामाबद्दल विचारले संगितले आहे.
केवळ देशातूनच नाही तर विदेशातून देखील लक्षद्वीपला पर्यटकांची मागणी वाढली आहे. आणखी क्रूझ जहाज कंपन्यांना लक्षद्वीपला प्रोत्साहन द्यायचे आहे. यातच हवाई कनेक्टिव्हिटी सुयोग्य झाल्यास पर्यटकांचा ओघ वाढेल, असा विश्वास देखील पर्यटन अधिकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याने द्वीपसमूह आणि त्याच्या प्रचंड पर्यटन क्षमतेकडे जगाचे लक्ष वेधले आहे. लक्षद्वीपला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनाच्या अफाट क्षमतेवर लक्ष केंद्रित केले आहे. ही आपल्या सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहे.” असे 4 जानेवारी रोजी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते.
पंतप्रधान मोदींनी केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते. नरेंद्र मोदींनी समुद्रकिनाऱ्यावर मोकळ्या आकाशाखाली छायाचित्रे क्लिक करून ती सोशल मीडियावर शेअर केली होती. लक्षद्वीपला त्यांच्या गंतव्यस्थानाच्या यादीत समाविष्ट करण्याचे आवाहन फोटो शेअर करताना त्यांनी केले होते.