ठाणे प्रतिनिधी :
दि. ०६ एप्रिल २०२४
भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे याना उमेदवारी जाहीर झाली. ही उमेदवारी जाहीर होताच कॉंग्रेसमध्ये नाराजी पसरली असून ही जागा कॉंग्रेसला मिळावी यासाठी भिवंडी कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीदेखील कोणतीही मदत सुरेश म्हात्रे यांना करायची नाही, अशी भूमिका घेतली आहे. भिवंडीत मैत्रीपूर्ण लढत लढावी यासाठी सुरेश टावरे यांच्यासह पदाधिकारी ठाम आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीत बिघडी होत, मिठाचा खडा पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
महाविकास आघाडीत भिवंडी लोकसभा मतदार संघावरून धुसफूस सुरु झाली आहे. भाजपकडून कपिल पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा झालेली नव्हती. त्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भिवंडीची जागा आपल्याच पदरात पडावी यासाठी प्रयत्न सुरू होते.
अशा वातावरणातच मागील दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये नाराजी पसरली. महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली. याचे कारण म्हणजे भिवंडी लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा परंपरागत मतदार संघ आहे.
काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे आणि काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी असहकारची भूमिका घेऊन सुरेश म्हात्रे यांना निवडणुकीत कोणतीही मदत करायची नाही, अशी उघड भूमिका घेतली आहे. त्यांनी वरिष्ठांना मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिला असून त्याबद्दल ते आग्रही आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नसतानाही, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने परस्परच सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारणा केल्यानंतर ही बाब आम्हाला समजली असल्याची माहिती माजी खासदार सुरेश टावरे यांनी दिली.
या मतदार संघात काँग्रेसच्या मतदारांची संख्या मोठी असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची काहीच ताकद येथे नाही . त्यामुळे म्हात्रे यांचे काम करणार नाही. मैत्रीपूर्ण लढतझाली तर ठीक नाहीतर सरळ घरी बसू किंवा काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर त्यांचे काम करू, असे काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे म्हणाले.
आगरी, कुणबी, आदिवासी अशा मतदारांचा भारणा असलेला भिवंडी मतदार संघ आहे. २००९ मध्ये काँग्रेसचा खासदार या मतदार संघात निवडून आला होता तर, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. हे निकाल लक्षात घेऊन काँग्रेसने या मतदार संघावर दावा केला होता. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही या जागेसाठी आग्रह धरला होता. तसेच काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही जागा काँग्रेसला मिळाली नाहीतर राजीनामा देऊ असा इशारा दिला. या जागेचा तिढा यामुळे वाढला होता.