अकोला प्रतिनिधी :
दि. ०८ एप्रिल २०२४
आज अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले, “मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात जे काही चालले आहे, त्यावरुन दोन्ही पक्षांना एकमेकांवर कुरघोडी करायची आहे हेच दिसून येते. आम्ही तुम्हाला दाखवून देऊ, अशी धमकीची भाषा केली जाते आहे. यातून महाविकास आघाडीत मुळातच समन्वय नसल्याचे दिसून येते”,
पुडे ते म्हणाले, “पहिल्या टप्प्याच्या लढतीत रामटेकमध्ये शिंदे गटाचे उमेदवार आणि अपक्ष किशोर गजभिये यांच्यातच जोरदार लढत आहे. तर सध्याच्या भंडारा गोंदियाच्या खासदारांना मोठा विरोध मतदारसंघातल्या पवनी भागात होत आहे. त्यांना लोकांनी थेट गावबंदी केली आहे. भाजपसोबत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे सेंटिंग आहे.”
“अजूनही आघाडीबाबत माझ्याकडे काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. माझ्या मते हा प्रस्ताव वर्तमानपत्रांपर्यंत आला असवा. नाना पटोलेंचा माध्यमातून आलेला वंचितला दिलेला प्रस्ताव म्हणजे वरातीमागून घोडं आहे. याचा विचार कोण करेल?” अशा शब्दात आंबेडकर यांनी पटोलेंवर टीका केली आहे. आता वंचित आणि महाविकास आघाडीचे समीकरण जुळणार नसल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.
“माझ्याकडे राज्यसभा खासदारकीसाठीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही़. नाना पाटोलेंच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय होणार नाही, आनंदराज आंबेडकरांना पुन्हा पाठींबा देण्याबाबत दोन दिवसांनी निर्णय घेऊ. शिरूरच्या उमेदवाराने बारामतीच्या निर्णयाला विरोध केल्याने त्यांना आता उमेदवारी देणार नाही. माझं भांडण सुप्रिया सुळेंसोबत नाही तर शरद पवारांसोबत आहे,” असेही ते म्हणाले.