अमरावती प्रतिनिधी :
दि. ०८ एप्रिल २०२४
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा आपला निर्णय बदलला आहे असे समजते. ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधू आहेत.
आपण ही लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याचे आज पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केले.
मागील दोन दिवसांपासून आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारीसंदर्भात संभ्रम होता. सुरुवातीला लोकसभेकरिता आनंदराज आंबेडकर यांनी अर्ज दाखल केला. याच दरम्यान वंचित आघाडीने मात्र याच जागेसाठी दुसरा उमेदवार जाहीर केला. त्यामुळे आनंदराज आंबेडकर नाराज झालेव त्यांनीनिवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु आपल्याकडे रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी आग्रह धरला तसेच अनेकांनी आपल्याला गळ घातल्याकारणाने आपण ही निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले.
अमरावती राखीव मतदारसंघात आंबेडकरी विचारधारेचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसून त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. आंबेडकरी जनतेला आपल्या रूपाने एक सशक्त पर्याय उपलब्ध झाल्याचा दावा त्यांनी केला. रिपब्लिकन सेना तसेच वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये योग्य तो समन्वय आहे आणि लवकरच वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा प्रचारदौरा आयोजित करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचेही ते म्हणाले.