नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ०८ एप्रिल २०२४
काँग्रेस योग्यरित्या चालवण्यात राहूल गांधी अपयशी ठरले आहेत. मागील 10 वर्षांत राहूल गांधीनी काँग्रेस पक्ष समर्थपणे चालवला नाही, गेल्या 10 वर्षांत काँग्रेसला अनेकदा यामुळेच अपयशाला सामोरं जावं लागलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. राहुल गांधींनी थोडा ब्रेक घ्यावा जर येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक असेल, आताही त्यांच्या पदरी अपयश आलं तर पुढील 5 वर्षांसाठी कॉंग्रेस पक्षाचं काम दुसऱ्या कोणाकडे तरी द्यावं, असा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला आहे.
एका मुलाखतीत बोलताना प्रशांत किशोर बोलत होते. ते म्हणाले मागील 10 वर्षांत राहूल गांधींनी काँग्रेस पक्ष सक्षमरित्या चालवला नाही, काँग्रेस पक्षाला योग्य पद्धतीने चालवण्यात ते अपयशी ठरले आहेत. या कारणामुळेच काँग्रेसला गेल्या 10 वर्षांत अनेकदा अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. यानंतरही पक्षाची धुरा ते दुसऱ्या कोणाच्या हातात द्यायला तयार नाहीत. राहुल गांधींनी, मागील 10 वर्षांत येणाऱ्या सततच्या अपयशामुळे आता थोडा ब्रेक घ्यायला हवा आणि पुढील 5 वर्षांसाठी पक्ष दुसऱ्या कोणा व्यक्तीच्या हातात सोपवावा, असंही प्रशांत किशोर पुढे म्हणाले.
दरम्यान, प्रशांत किशोर यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, जगभरात अनेक चांगले नेते आहेत आणि आपली कमतरता स्वीकारण्याचा एक चांगला गुण त्यांच्या अंगी आहे आणि ती दूर करण्याचा प्रयत्नही ते करतात.
परंतु, आपण सर्वज्ञानी आहोत, असं राहुल गांधींना वाटतं. शिवाय कोणाच्या मदतीची गरज नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची मदत कोणीच करू शकत नाही. तसेच राहुल यांना जे काम योग्य वाटतं ते अंमलात आणणार्या कोणातरी व्यक्तीची आता गरज आहे. परंतु, हे शक्य दिसत नाही, असंही प्रशांत किशोर पुढे म्हणाले.
राहूल गांधींनी 2019 च्या निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, याची आठवण करून देऊन किशोर म्हणाले,
राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी तेव्हा म्हणाले होते की, ते माघार घेतील आणि दुसऱ्या कोणाकडे तरी पक्षाची धुरा सांभाळण्यास देतील. मात्र वास्तवात ते बोलले त्याच्या अगदी विरुद्ध काम करत आहेत.
प्रशांत किशोर आणखी एक खुलासा करताना म्हणाले की, अनेक नेते खासगीत बोलतात की, एका विशिष्ट व्यक्तीच्या परवानगीशिवाय पक्षात कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही. त्यामुळे सातत्याने पक्षाला अपयश येत आहे आणि ही गोष्ट मान्य करून एकट्याने काम करण्याचा आग्रह राहूल गांधींनी धरू नये.