मुंबई प्रतिनिधी :
दि. ०९ एप्रिल २०२४
महायुतीचा उमेदवार मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी अद्यापही ठरलेला नाही. महायुतीत हा मतदार संघ शिवसेनेला (शिंदे गट) देण्याबाबत विचार सुरू आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत (शिंदे गट) खासदार मिलिंद देवरा आलेले आहेत. त्यांनाच या मतदार संघातून निवडणूक लढविण्याबाबत विचारणा करण्यात येत आहे. दोन उमेदवारांच्या नावाची चर्चा भाजपकडूनही आहे.
शिवसेना (शिंदे गट) या मतदार संघासाठी आग्रही आहे कारण गेली 10 वर्षे दक्षिण मुंबई मतदार संघ शिवसेनेकडे आहे. तर, या मतदार संघातून आपलाही उमेदवार लोकसभेत पाठवायला भाजप उत्सुक आहे. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे या जागेसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तरी ही जागा कोणाला द्यायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
यातच गेल्या काही दिवसांतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपच्या नेत्यांशी वाढलेली सलगी पाहता ही जागा मनसेशी युती करून त्यांना दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदार संघात राहुल नार्वेकर यांनी प्रत्यक्ष प्रचार सुरू केला नसला तरी त्यांनी मतदारसंघात संपर्क सुरू केला आहे. मात्र, अद्यापही भाजप नेत्यांना नार्वेकर यांच्या विजयाची खात्री नाही. मंगल प्रभात लोढा यांचा या जागेवर दावा आहे, पण लोढा यांना विरोध होऊ शकतो. त्यांचे नावही सध्या त्यामुळे चर्चेत नाही.
शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांच्या नावाचा विचार त्यामुळेच सुरू आहे. देवरा मैदानात उतरल्यास काँग्रेसचे मतदार काही प्रमाणात त्यांना पसंती दर्शवू शकतात अशी अटकळ बांधली जात आहे. देवरांना भाजपचे गुजराती आणि जैन मतदारही पसंती देऊ शकतात. मराठी मतांचा जो प्रश्न निर्माण होईल तो, मराठी मतांत विभाजन झाल्यास सुटू शकतो. अरविंद सावंत यांचं मताधिक्य त्यामुळे कमी होऊ शकते. अप्रत्यक्षरीत्या याचा फायदा देवरा यांना मिळू शकतो.
दरम्यान, आणखी एखादा तगडा मराठी उमेदवार मराठी मतांत विभाजन करण्यास द्यावा लागेल. त्यासाठी मनसेचा उमेदवार रिंगणात उतरवून देवरा यांना फायदा मिळू शकतो. त्यादृष्टीनं चर्चा महायुतीच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेची मैत्रीपूर्ण मदत घेऊन त्याच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीत मनसेला त्यांच्या जागा जिंकून देण्यासाठी महायुती मदत करू शकते अथवा काही प्रमाणात सत्तेत वाटा देण्याचेही आश्वासन देऊ शकते.
मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातील घोषणेकडे यामुळे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. याबाबत जास्त बोलण्यास बाळा नांदगावकर यांनी नकार दिला. पण नांदगावकरांनी, आदेश दिल्यास तयार असल्याचे सूचक विधान मात्र केले.