नाशिक प्रतिनिधी :
दि. १० एप्रिल २०२४
नाशिक लोकसभा मतदार संघात कोण उमेदवार असावा? हा प्रश्न अजूनही अधांतरी आहे. या संदर्भात रोज नव्या चर्चा ऐकायला येत आहेत. भाजप नेते गिरीश महाजन यांनी या पार्श्वभूमीवर वक्तव्य केले आहे.
गेले दोन आठवडे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाबाबत वाद सुरू आहे. या संदर्भात शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सातत्याने केल्या जाणार्या दाव्याला भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते विरोध करत आहेत. त्यामुळे नाशिक मतदारसंघ नेमका कोणाला दिला जाणार हा प्रश्न दिवसेंदिवस वादग्रस्त आणि गहन होत चालला आहे. त्यामुळेच उमेदवाराची घोषणाही लांबते आहे. भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आता यावर मार्ग सांगितला आहे.
महाजन म्हणाले, “नाशिक मतदार संघातच नव्हे तर राज्यातील चार ते पाच जागांबाबत असाच वाद आहे. महायुतीमध्ये तीन पक्ष असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील महायुतीचे नेते आहेत आणि या तीनही नेत्यांमध्ये चांगला समन्वय आहे. हे सारे पाहाता हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे वाटते. महायुतीच्या नेत्यांनी राज्यस्तरावर याबाबतचा निर्णय घ्यावयाचा आहे. त्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. चर्चेतून हा प्रश्न सुटू शकतो. भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड त्यानंतर याबाबत विचार करील.”
“महायुतीमध्ये, भारतीय जनता पक्षासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस असे एकूण तीन पक्ष आहेत. त्यांच्यात कुठेही वाद किंवा मतभेद नाहीत. त्यामुळे महायुतीचे सर्व नेते येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय ताकदीने प्रचारात उतरतील. पुढील आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातील प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्व नेत्यांच्या उपस्थितीत मेळावयाचे आयोजन केले आहे.” असे महाजन पुढे म्हणाले.