अमरावती प्रतिनिधी :
दि. ११ एप्रिल २०२४
अमरावती मतदारसंघ परिसीमन आयोगाने निर्मित केलेला असून अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. तरी आंबेडकरी पक्षांच्या मताधिक्यांचा आलेख मात्र उतरता आहे. राखीव मतदारसंघात आंबेडकरी पक्षांना स्वतःचा उमेदवार निवडून आणता आलेला नाही कारण आंबेडकरी चळवळीतील मतदार राष्ट्रीय पक्षांकडेच आकर्षित झालेले आहेत .
मतदारसंघ राखीव झाल्यानंतर रिपाइं व बसप या पक्षांचे मताधिक्य घसरल्याचे दिसून आले आहे. यावेळी लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात विक्रमी ३७ उमेदवार रिंगणात आले आहेत. ही संख्या गतवेळी २४ होती तर २०१४ साली ती १९ व २००९ मध्ये २२ इतकी होती.
गेल्या तीन निवडणुकांत आंबेडकरी मतांचा मोठा हिस्सा वाट्याला येणार्या बहुजन समाज पक्षाच्या मतांचा आलेख घसरलेला आहे. बसपच्या माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांना २००९ मध्ये ५.७ टक्के, २०१४ मध्ये गुणवंत देवपारे यांना ९.८ टक्के व २०१९ मध्ये माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे यांना केवळ १.१ टक्के मते मिळाली आहेत.
उमेदवार बदलण्याचा प्रयोग प्रत्येक निवडणुकीत बसपने केला. मात्र या पक्षाला २०१४ ची निवडणूक वगळता फार मते खेचता आलेली नाहीत. याउलट पहिल्यांदाच २०१९ साली रिंगणात आलेल्या वंचित बहुजन आघाडीने ५.९ टक्के मते खेचत निकाल बदलण्याची किमया करून दाखवली. आंबेडकरी चळवळीचा इतिहास असलेल्या अमरावती मतदारसंघात आंबेडकरी पक्षांना फारसा प्रभाव निवडणुकीत पाडता आलेला नाही.
अमरावती लोकसभा मतदारसंघ राखीव होण्यापूर्वी २००४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रिपाइंच्या रा. सू. गवई यांनी या मतदारसंघात २२.३ टक्के मते घेतली होती. तर २००९ च्या निवडणुकीत मतदारसंघ राखीव झाल्यानंतर, त्यांनी मतांचा टक्का वाढवत तो ३४.५ टक्क्यांवर नेला. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे समर्थन या दोन्ही निवडणुकांत त्यांना होते.
रिपाइंच्या बॅनरखाली २०१४ ची निवडणूक लढलेले त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई हे मात्र त्यावेळेस फार मते खेचू शकले नाहीत. त्यांना केवळ ५.४ टक्के मते मिळाली. बसपचे गुणवंत देवपारे यांनी त्याचवेळी त्यांच्यापेक्षा अधिक मते खेचत ९.८ टक्के मते मिळवली. २०१९ मध्ये रिपाइंने उमेदवार दिला नव्हता. त्यावर्षी त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारास समर्थन दिले होते. रिपाइंने (गवई) यावर्षीही रिंगणातून माघार घेतली आहे.