पुणे प्रतिनिधी :
दि. ११ एप्रिल २०२४
अजित पवार आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला महात्मा फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आज आपण फुले वाड्यामध्ये महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी आलो असल्याचं पवार म्हणाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
“विजय शिवतारे यांच्या समवेत जेव्हा बैठक झाली त्याच वेळेस पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा तसेच एमआयडीसीच्या संदर्भातील विषयांबाबत त्यांनी चर्चा केली”, असे त्यांना सासवडमधील सभेबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले. ते म्हणाले की, ते महायुतीच्या बरोबर आहेत. परंतु हे विषय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गी लावले पाहिजेत, ते प्रश्न हे काही पुरंदर विधानसभा आणि काही बारामती लोकसभा मतदारसंघ, भोर मधल्या काही भागातले आहेत. त्यामुळे आमची चर्चा हे विषय सोडविण्याच्या दृष्टिकोनातून झाली. त्याचवेळी शिवतारे म्हणाले होते की, ते एक दिवस सभा आयोजित करतील, ज्या सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येतील असं आम्ही आश्वासन दिलं होतं.
तर मंगळवारी बारामतीमध्ये झालेल्या एका मेळाव्यादरम्यान एक गौप्यस्फोट अजित पवारांनी केला होता. त्यांनी एका ज्येष्ठ नेत्याचा रात्री बारा वाजता विजय शिवतारे यांना उमेदवारी मागे न घेण्याबाबत फोन आल्याचा उल्लेख केला होता. हा ज्येष्ठ नेता नेमका कोण होता? याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “तुम्ही मला मी मूर्ख समजू नका? आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे, त्या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं तेवढं मी बोललो आहे आणि तेवढंच मी बोलेन. मला जे सांगायचं ते मी सांगितलं आहे.”
अजित पवार युतीमधील जागा वाटपावर बोलताना म्हणाले, “सातारा आणि नाशिक सगळं सुरळीत होईल, आपण काळजी करू नका. कारण अजून काही पुढच्या टप्प्यात फॉर्म भरायला सुरुवात झालेली नाही. नाशिक किंवा कोकण यांचे फॉर्म शेवटच्या टप्प्यात भरायचे आहेत. आज मी मुख्यमंत्र्यांबरोबरच परत जाताना, जागा वाटपाबद्दलची चर्चा करून योग्य तो मार्ग आम्ही काढू.”
एकनाथ खडसे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्यावर बोलताना अजित पवार म्हणले, “खडसेंची घरवापसी झाली आहे, भाजप वाढवणाऱ्यांमध्ये गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाज, नितीन गडकरी आणि एकनाथराव खडसे यांची नावे घेता येतील. उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने खडसे यांनी केलं. तिथे खडसेंचं प्रभुत्व, मी राजकारणात आल्यापासून होतं. त्यांचं मोठं योगदान भाजपासाठी आहे. ते काही काळ राष्ट्रवादीमध्ये आले असले तरी आता मात्र ते पुन्हा भाजप प्रवेश करत आहेत.”