नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ११ एप्रिल २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील प्रसिध्द मॅगझिन ला मुलाखत देत, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत चीन आणि पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर भाष्य केले आहे. चीनसोबतचे संबंध भारतासाठी महत्वपूर्ण आहेत. सीमेबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेले वाद संपवण्यासाठी तातडीने चर्चा करणे आवश्यक आहे. जगासाठी दोन्ही देशांमधील शांतीपूर्ण संबंध महत्वाचे आहेत, असे मोदींनी या मुलाखतीत म्हटले आहे.
या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या नेतृत्वाखाली भारताची झालेली आर्थिक प्रगती, पायाभूत सुवधांचा विकास, पर्यावरणाशी संबंधित मुद्दे, चीनसोबतचे भारताचे संबध, मुस्लिमांबाबत होत असलेले आरोप तसेच प्रेसच्या स्वातंत्र्याबाबतही उत्तरे दिली. आपल्या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करत लोकांचा विश्वास जिंकला आहे असे मोदी म्हणाले.
“राजकीय आणि सैन्य स्तरावर सकारात्मक, रचनात्मक द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून चीन आणि भारताच्या सीमांवर शांती आणि स्थिरता निर्माण होईल, याबाबत मला विश्वास आहे. हे केवळ दोन देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी महत्वाचे आहे” असे चीन आणि पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत मोदी म्हणाले.
पाकिस्तानबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, ‘भारताने नेहमीच शांतता, सुरक्षा आणि समृध्दीसाठी दहशतवाद आणि हिंसेला विरोध केलेला आहे.’ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेबाबत विचारता, मोदींनी पाकिस्तानची ही अंतर्गत बाब असल्याचे सांगत बोलणे टाळले.
चीन आणि भारतातील संबंध २०२२ नंतर, अधिक तणावपूर्ण बनले आहेत. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये लडाखमधील गलवान येथे संघर्ष झाला. त्यानंतर दोन्ही देशांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. भारताचे जवळपास 20 जवान या संघर्षामध्ये शहीद झाले होते.
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या कोणत्याही पातळीवर चर्चा ठप्प आहे. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाल्यानंतर भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. या घटना लोकसभा निवडणुकीआधीच घडल्या होत्या.