मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ एप्रिल २०२४
मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात अभिनेत्री सई ताम्हणकरने गेल्या काही दिवसांत दबदबा निर्माण केला आहे. स्वप्नं पाहिली आणि त्यांना कर्तृत्त्वाची साथ मिळाली की ती सत्यात उतरायला काहीच बंध नसतात. सई ताम्हणकर याचं मूर्तीमंत उदाहरण आहे. तिच्यासाठी २०२४ हे वर्ष सर्वार्थाने खास ठरत आहे. सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार्या सईची आणखी एक स्वप्नपूर्ती झाली आहे.
सईने गुढीपाडव्याच्या शुभदिवशी आलिशान गाडी खरेदी केली आहे. सईने नवीकोरी मर्सिडीज बेंझ गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली आहे. यावेळी तिची आई आणि काही कुटुंबीय उपस्थित होते. लेकीचा आनंद पाहून तिची आई देखील भारावून गेल्याचं एका व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं आहे.
सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करून सई ताम्हणकरने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. मुंबईत तिने आलिशान घर घेतलं. त्यात आता तिच्या घरी ही आलिशान गाडी आल्याने सध्या नेटकऱ्यांसह कलाकार मंडळींचा सईवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. “तुम्ही काय करू शकता किंवा काय नाही हे कोणाला सांगू नका. स्वप्न पाहा, ते साध्य करा अन् ते जगा!” अश्या कॅप्शनचा हा व्हिडीओ सईने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सई ताम्हणकर, ‘श्रीदेवी प्रसन्न’, आणि ‘भक्षक’नंतर आता ‘डब्बा कार्टल’, ‘अग्नी’, ‘ग्राउंड झिरो’ अशा वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्समध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. सध्या नेटकर्यांचा तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.