पुणे प्रतिनिधी :
दि. ११ एप्रिल २०२४
विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी, आयटी हब अशी पुण्याची ओळख आहे हे आपण सर्वजण जाणतो. या पुणे शहराला लोकसभा २०२४ च्या निमित्ताने आणखी एक मान मिळाला आहे. पुणे शहराची, राज्यातील सर्वाधिक मतदार असलेले शहर अशी नवीन ओळख आता झाली आहे. पुण्याची एकूण मतदार संख्या आता 82 लाख 82 हजार 363 वर जाऊन पोहचली आहे. मतदारांची नोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सकारात्मक व ठोस पावले उचलण्यात आल्याने मतदारांची विक्रमी संख्या गाठण्यात पुण्याला यश आले आहे.
आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात, 16 मार्चला पत्रकारपरिषद घेऊन लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. ही पत्रकारपरिषद झाल्यानंतर संपूर्ण देशात आचारसंहिता सुरू झाली आहे. महाराष्ट्रात, विविध जिल्ह्यातील 48 लोकसभा मतदारसंघांत, पाच टप्प्यांत ही निवडणूक पार पडणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमधील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. पुणे जिल्ह्याने राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक मतदार असलेला जिल्हा म्हणून मान मिळविला आहे.
पुणे जिल्ह्यामागोमाग सर्वाधिक मतदारसंख्या मुंबई उपनगरची दिसते आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी 73 लाख 56 हजार 596 इतके मतदार आपला हक्क बजाविणार आहेत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्याची एकूण मतदार संख्या 42 लाख 72 हजार 366 इतकी झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 48 लाख 08 हजार 499 इतकी आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाण्याची एकूण मतदार संख्या 65 लाख 79 हजार 588 एवढी झाली आहे. राज्यात पुणे जिल्ह्याची एकूण मतदार संख्या सर्वाधिक असली तरी आता जिल्हा प्रशासनासमोर, मतदानाच्या दिवशी मतदारांना बाहेर काढून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांसह अहमदनगर, जळगाव, आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये 30 लाखांहून अधिक मतदार आहेत. सोलापूरमध्ये एकूण मतदार 36 लाख 47 हजार 141 इतके आहेत. अहमदनगर जिल्ह्यात एकूण मतदार संख्या 36 लाख 47 हजार 252 आहे. कोल्हापूरमध्ये एकूण मतदार 31 लाख 72 हजार 797 इतके, तर जळगावमध्ये 35 लाख 22 हजार 289 हे एकूण मतदार आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण मतदार 30 लाख 48 हजार 445 इतके आहेत. तर बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या 10 जिल्ह्यांमध्ये 20 लाखांहून अधिक मतदार आहेत.
राज्यातील त्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक आहेत. या चार जिल्ह्यांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार या अधिक असल्याचे समोर आले आहे. रत्नागिरीमध्ये पुरूष मतदार सहा लाख 31 हजार असून महिला मतदार या सहा लाख 72 हजार आहेत. नंदूरबारमध्ये सहा लाख 37 हजार पुरूष मतदार, तर सहा लाख 39 हजार महिला मतदार आहेत. सिंधुदुर्ग मध्ये तीन लाख 30 हजार पुरूष मतदार तर महिला मतदार तीन लाख 32 हजार इतक्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात महिला मतदार पाच लाख 51 हजार आहेत. तर पुरूष मतदार संख्या पाच लाख ४१ हजार आहे.